
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेनंतर वनडे सीरिजचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. त्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत अंडर 19 टीम इंडियाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी हा देखील खेळणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेचा थरार हा 26 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. भारतातील एकूण 6 शहरांमधील 14 मैदानांमध्ये या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेला केव्हापासून सुरुवात होणार? सामने कुठे पाहता येणार? हे सविस्तर जाणून घेऊया.
32 टीम आणि 4 ग्रुप
या स्पर्धेत एकूण 38 संघ खेळणार आहेत. एलीट आणि प्लेट या 2 तुकड्यांमध्ये संघं विभागण्यात आले आहेत. स्पर्धेत एलीट गटात एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. या 32 संघांची विभागणी 8-8 नुसार 4 गटात करण्यात आली आहे. तर प्लेट गटात 6 संघ आहेत.
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचा सहभाग
यंदा या सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत टीम इंडियाचे स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे सामन्यांना क्रिकेट चाहत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भारतीय टी 20i संघातील सूर्यकुमार यादव याच्या व्यतिरिक्त ऑलराउंडर हार्दिक पंड्या, स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. तसेच वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कोणत्या ग्रुपमध्ये कोणती टीम?
एलीट क्लासमधील डी ग्रुपमध्ये दिल्ली, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, सौराष्ट्र, तामिळनाडु, त्रिपुरा आणि उत्तराखंड या संघांचा समावेश आहे.
एलीट क्लासमधील सी ग्रुपमध्ये बडोदा, बंगाल, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा, पंजाब, पुड्डेचरी आणि सर्व्हीसेज या संघांचा समावेश आहे.
एलीट क्लासमधील बी ग्रुपमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, बिहार, चंदीगड, गोवा आणि हैदराबाद टीमचा समावेश आहे.
एलीट क्लासमधील ए ग्रुपमध्ये मुंबई, विदर्भ, मध्य प्रदेश, आसम, छत्तीसगड, केरळ, ओडिशा आणि रेलवे टीमचा समावेश आहे.
तर प्लेट ग्रुपमध्ये नागलँड, सिक्कीम, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयचा समावेश आहे.
सामने टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?
या स्पर्धेतील ठराविक क्रिकेट सामने हे टीव्ही-मोबाईलवर दाखवण्यात येणार आहेत. हे सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तर जिओहॉटस्टार एपवरुन मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.