
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. क्रिकेट चाहत्यांना साखळी फेरीत एकूण 20 संघांमध्ये 40 सामने पाहायला मिळाले. चाहत्यांना या दरम्यान 2 उलटफेर पाहण्याची संधी मिळाली. झिंबाब्वे टीमने ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर श्रीलंकेला पराभूत केलं. तसेच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात क्रिकेट प्रेमींना तब्बल डबल सुपर ओव्हर पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तावर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. साखळी फेरीतून 12 संघांचं पॅकअप झालं. तर 8 संघांनी सुपर 8 फेरीत धडक दिली. आता सुपर 8 फेरीत क्रीडा प्रेमींन एकसेएक सामने पाहायला मिळणार आहेत.
8 संघ आणि 12 सामने
सुपर 8 फेरीत एकूण 8 संघात 12 सामने खेळवण्यात येणार आहेत. सुपर 8 फेरीत 21 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हे सामने होणार आहेत. सुपर 8 मधील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर 3 संघाविरुद्ध 1 सामना खेळणार आहे. त्यानुसार दोन्ही गटातील प्रत्येकी 2 अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
कोणत्या ग्रुपमध्ये कोणती टीम?
ए ग्रुप : टीम इंडिया, वेस्ट इंडिज, झिंबाब्वे आणि दक्षिण आफ्रिका
बी ग्रुप : श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड
टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना कधी?
यजमान आणि गतविजेता टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना हा रविवारी 22 फेब्रुवारी होणार आहे. सुपर 8 निमित्ताने 2024 च्या टी 20I वर्ल्ड कप अंतिम फेरीतील 2 संघ आमेनसामने येणार आहेत. टीम इंडियासमोर सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे.
त्यानंतर टीम इंडिया सुपर 8 फेरीतील आपला दुसरा सामना 26 फेब्रुवारीला खेळणार आहे. तर सूर्यासेनेचा सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अंतिम समना हा 1 मार्चला वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे.