सावधान! दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, थेट प्रशासनाचा अलर्ट.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 27, 2026

सावधान! दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, थेट प्रशासनाचा अलर्ट..

सावधान! दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, थेट प्रशासनाचा अलर्ट..

अवकाळी पावसाने आता ब्रेक घेतला आहे. मात्र, उष्णतेचा भडका उडाला आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. सुर्य आग ओकताना दिसत आहे. यादरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी. अतिमहत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे टाळा. अकोला आणि अमरावती येथे 46 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदवले गेले. अमरावती, अकोला आणि वर्धा येथे भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. अनेक जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. यादरम्यान नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उष्णघाताची समस्या निर्माण होऊ शकते. प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचा अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सूचना जारी केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढली असून तापमान थेट 38 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आजसाठी रायगडमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. साधारण 26 ते 27 अंशांदरम्यान असणारे तापमान अचानक वाढून 38 अंशांवर गेल्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत आहे. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये तापमानाने 43 अंशांचा टप्पा गाठला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे रस्ते अक्षरशः निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये आणि बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाशिम जिल्ह्यात सध्या उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत असून तापमानाने तब्बल पुन्हा 43 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. एप्रिल महिन्यातच उष्णतेने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या वेळात उकाड्याची तीव्रता एवढी वाढली आहे की रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उष्माघाताचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे.