IPL 2026, KKR vs GT : कोलकाता नाईट रायडर्सने गुजरातला केलं पराभूत, प्लेऑफचा गुंता वाढला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 17, 2026

IPL 2026, KKR vs GT : कोलकाता नाईट रायडर्सने गुजरातला केलं पराभूत, प्लेऑफचा गुंता वाढला

IPL 2026, KKR vs GT : कोलकाता नाईट रायडर्सने गुजरातला केलं पराभूत, प्लेऑफचा गुंता वाढला

आयपीएल 2026 स्पर्धेतील 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या सामन्यात गुजरात टायटन्सला 29 धावांनी पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कोलकात्याने या संधीचा फायदा घेतला आणि 20 षटकात 2 गडी गमवून 247 धावा केल्या. तसेच विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही गुजरात टायटन्सला गाठता आलं नाही. त्यामुळे प्लेऑफचं गणित या सामन्यातही सुटलं नाही. खरं तर हा सामना गुजरात टायटन्सने जिंकला असता तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला असता. पण तसं झालं नाही. त्यामुळे प्लेऑफचं गणित लांबलं आणि आणखी गुंतागुंतीचं झालं आहे. खरं तर केकेआरचं स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम ठेवलं आहे. केकेआरचे या विजयासह 11 गुण झाले आहेत. तर उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर 15 गुण होतील. त्यामुळे एखादा चमत्कार घडला तर कोलकाता प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकते.

गुजरात टायटन्सचा डाव

केकेआरने विजयासाठी दिलेल्या 248 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने आश्वासक सुरूवात केली. साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी 18 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. पण दुखापतीमुळे साई सुदर्शन रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे धावांचा वेग मंदावला निशांत सिंधु फलंदाजीला आला पण 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर शुबमन गिलने जोस बटलरसोबत डाव सांभाळला. पण शुबमन गिलची विकेट पडली आणि सामन्याचं चित्र पालटलं. शुबमन गिल 49 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. त्यानंतर जोस बटलरही 35 चेंडूत 57 धावांवर बाद झाला. रिटायर्ड हर्ट झालेल्या साई सुदर्शनने पुन्हा फलंदाजीला उतरून 28 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. मात्र विजय खेचून आणता आला नाही. गुजरात टायटन्स 218 करू शकला.

कोलकाता नाईट रायडर्सचा डाव

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून अजिंक्य रहाणे आणि फिन एलन ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. अजिंक्य रहाणे 14 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर फिन एलन आणि अंगकृष रघुवंशी यांचं वादळ घोंघावलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 95 धावांची भागीदारी केली. फिन एलनने 35 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकार मारून 93 धावा केल्या आणि बाद झाला. त्याचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. फिन एलन बाद झाल्यानंतरही अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन यांनी फटकेबाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 52 चेंडूत नाबाद 108 धावांची खेळी केली. अंगकृष रघुवंशीने 44 चेंडूत नाबाद 82 धावा, तर कॅमरून ग्रीनने 28 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या.