
इराणसोबत शांतता करारासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की शांतता करारावर उद्या सह्या होतील आणि त्यानंतर लागलीच होर्मुझ स्ट्रेट खुले केले जाईल. तसेच परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ‘न्यूक्लिअर डस्ट’ घेण्यासाठी अमेरिका इराणला जाईल. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील दावा केला आहे की अमेरिका-इराण शांतता करारावर येत्या २४ तासात अंतिम स्वरुप प्राप्त होऊ शकते. इस्लामाबादने संकेत दिले आहेत की उद्या (रविवारी ) या करारावर स्वाक्षरी होण्याची आशा आहे. त्यामुळे अनेक महिन्याच्या संघर्ष आणि चर्चेनंतर धोरणात्मक वाटाघाटींना यश येण्याची आशा जागविली आहे.
इराण सोबतच्या शांतता करारावर मोठा दावा करीत ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की इराणसोबत बराक ओबामाची डील JCPOA ही अण्वस्र मिळवण्याचा एक सोपा आणि शानदार थेट मार्ग होता. जर ती डील राहीली असती तर इराणजवळ सहा वर्षांपूर्वीच अण्वस्रे आली असती आणि तेव्हा इराणने ती वापरली देखील असती. इराणसोबतचा माझा करार याच्या नेमका उलटा आहे.
होर्मुझ स्ट्रेट देखील उघडणार
ट्रम्प म्हणाले की वास्तवात आता इराणला अण्वस्रे नकोत आणि त्यांना ती त्यांना मिळणारही नाहीत, मग ती खरेदी करुन असो, की बनवून वा कोणत्याही प्रकारे…ते म्हणाले की या डीलवर उद्या सह्या होणार आहेत आणि सह्या होताच होर्मुझ स्ट्रेट सर्वासाठी उघडला जाईल. इराणसोबत आमचे नाते गेल्या सरकारच्या तुलनेत खूप वेगळे आणि चांगले आहे.ओबामानी त्यांना जे अब्जो डॉलर दिले होते. ज्यात १.७ अब्ज डॉलर रोखीने होते. त्याच्या उलट आता कोणतीही पैशांची लेन-देन होणार नाही.
संपूर्ण मध्य पूर्वेसोबत मिळून काम करू
योग्य वेळ आल्यानंतर, जेव्हा सर्व काही शांत होईल, तेव्हा आम्ही आमची भव्य बी-२ बॉम्बर्स विमाने आणि त्यांच्या उत्कृष्ट वैमानिकांच्या मदतीने, त्या ग्रॅनाईट पर्वतांखाली खोलवर गाडलेले आण्विक साहित्य (न्यूक्लिअर डस्ट) बाहेर काढू, त्याला कमकुवत करू आणि नष्ट करू. आम्ही भविष्यात इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेसोबत मिळून काम करण्यास उत्सुक आहोत. आम्हाला आशा आहे की ही प्रक्रिया जलद, सुरळीतपणे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. जर तसे झाले नाही, तर आमच्याकडे एक शेवटचा उपाय आहेच आणि आशा आहे की आम्हाला तो कधीही वापरावा लागणार नाही….
अंतिम टप्प्यात आपले स्वागत आहे…
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका-इराण वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे स्वागत आहे, ज्यासाठी उद्या (रविवारी) इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी समारंभ नियोजित आहे. तसेच, या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे या प्रदेशात चिरस्थायी शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्यास हातभार लागेल, अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र, या घोषीत केलेल्या कालमर्यादेबाबत व्हाईट हाऊस किंवा इराणी अधिकाऱ्यांकडून तात्काळ कोणताही दुजोरा मिळालेला नाही.