
मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला. सकाळीही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा राज्यभरात दिला. कोकण आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला. राजस्थानच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. ओराई, सिधी बंकुरा ते मणिपूरपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. यासोबतच गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीमध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. सातारा, रायगड, पुणे आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल. भंडारा, गोदिंया, वर्धा, अकोला, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. आज मुंबईमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावेल.
देशातील विविध राज्यात पावसाने मोठे तांडव घातले. सततच्या पावसाने जनजीवन विस्काळीत झाले. त्यामध्येच गुजरात आणि आराममध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हेच नाही तर पुरातून लोकांना वाचवण्यासाठी थेट लष्कराची मदत घ्यावी लागतंय. हवामान विभागाने 22 राज्यांमध्ये तीव्र वादळाचा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून यादरम्यान जोरदार पाऊस कोसळेल.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आगामी दिवसात भारतातील पावसाची तीव्रता काहीशी कमी होईल. पण पुढील दोन दिवस कर्नाटकचा किनारी भाग आणि दक्षिण अंतर्गत भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जून महिन्याच्या तुलनेत राज्यात जुलै महिन्यात तूफान पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याचीही सुरूवात चांगल्या पावसाने झाल्याचे बघायला मिळतंय.
पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या पाचही जिल्ह्यांत मागील 2 दिवसांत तब्बल45 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात पाच जण पुरात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे तर भिंत अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे. याशिवाय 120 वर लहान-मोठ्या गुरांचा मृत्यू पुरामुळे ओढवला आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अमरावती जिल्ह्यात72 हजार हेक्टर वर सोयाबीन ,तूर ,कपाशी, संत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.