
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जंतर-मंतर 2.0 ची घोषणा केली आहे. मुंबईत काल सीजेपीचे आंदोलन झाले. त्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. ज्ञानेश कुमार यांच्या खाद्यावरून दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावेळी जंतरमंतर गजबजून गेले होते. आता दिपके ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन करणार आहे. यामुळे दिल्ली पोलीस हायअलर्टवर आहेत.
10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर 2.0
यापूर्वी मे ते जून या कालावधीत दिपके यांनी तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवले. त्यांच्या आंदोलनाला देशभरातून व्यापक प्रतिसाद मिळाला. काल पोलीस आणि स्थानिकांचा विरोध असतानाही दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जोरदार आंदोलन केले. केंद्रीय निवडणूक आयोगाला संदेश देण्यात आला. निवडणूक आयुक्त ही भाजपची एक शेल कंपनी असल्याची घणाघाती टीका दिपके यांनी केली. तर सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांनी 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर 2.0 ची घोषणा केली. 10 तारखेला दिल्लीत सीजेपीचे आंदोलन होणार आहे.
10 तारखेपर्यंत राजीनामा द्या
अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, ज्ञानेश कुमार यांनी लागलीच राजीनामा द्यावा. 10 ऑक्टोबरपर्यंत त्यांना मुदत देण्यात आली आहे. जर त्यांनी 10 तारखेपर्यंत राजीनामा दिला नाही तर कॉकरोच जनता पार्टी दिल्लीत जंतरमंतरपर्यंत मार्च करणार आहे. आता ते जंतरमंतरवरच ठिय्या मांडून बसतील की हे आंदोलन एका दिवसाचे असेल याविषयी त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. पण अगोदरच्या आंदोलनाचा इतिहास पाहता दिल्ली पोलीस हायअलर्टवर आहे.
If Gyanesh Kumar doesn’t resign, cockroaches from across India will march to Delhi & protest at Jantar Mantar on October 10.
If Delhi Police tries to stop us, wherever they stop us will become our Jantar Mantar..
Ours will be a peaceful andolan. We will walk on the path shown…
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 2, 2026
हे आंदोलन शांतीपूर्ण असेल. आम्ही महात्मा गांधी यांच्या रस्त्यावर चालू. आता हे सरकार आणि दिल्ली पोलिसांवर अवलंबून आहे की ते 20 जुलैसारखी कठोरता दाखवता की आमच्या आंदोलनाचा सन्मान करतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पोलिसांनी विरोध केला तरी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतरकडे कूच करणार हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे दिल्लीत अजून एक मोठे वादळ येण्याची शक्यता आहे.