अॅमेझॉनला ठगवून 'त्यांनी' कमावले २० कोटी! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 14, 2019

अॅमेझॉनला ठगवून 'त्यांनी' कमावले २० कोटी!

https://ift.tt/2OKhFwM
लखनऊ: चोरी आणि लूटमार करायची असेल तर पैसे, दागदागिने, मोबाइलच हिसकावे लागतात असं काही नाही. लखनऊ पोलिसांनी चोरीचा एक अजब प्रकार उघडकीस आणला आहे. सायबर क्राइम शाखेने शनिवारी रात्री दोन युवकांना अटक केली. हे दोघे जण अॅमेझॉनवरून महागडे प्रोटिनचे डब्बे मागवायचे आणि त्यात स्वस्तातली पावडर मिसळून विकायचे. या फसवणुकीतून या आरोपींनी सुमारे २० कोटी रुपये कमावले असा पोलिसांचा दावा आहे! वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी रविवारी या घटनेबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की जयपूरचा सोहित सोनी आणि राहुल सिंह अॅमेझॉनवर एक कंपनीचं महागडं वे-प्रोटिन ऑर्डर करायचे. डब्यांची डिलिव्हरी झाल्यावर ते त्यातली प्रोटिन पावडर काढून त्यात दुसरी स्वस्तातली प्रोटिन पावडर भरायचे. अशी केली कोट्यवधींची कमाई यानंतर ते स्टीकर लावून डबे आधीसारखेच नीट पॅक करून कंपनीला रिटर्न करायचे आणि रिफंड घ्यायचे. नंतर वेगवेगळ्या जिममध्ये जाऊन महागडी प्रोटिन पावडर स्वस्तात विकून कमाई करायचे. पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार, या दोघांनी २०१७ सालापासून उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत फसवणूक करत २० कोटी रुपये जमा केले आहेत. आरोपींनी पोलिसांवरच केले आरोप अटक केलेल्या तरुणांनी आरोप केला की अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांचे फसवणुकीचे प्रकार पोलीस त्यांच्यावर थोपवत आहेत. सोहितच्या म्हणण्यानुसार, तो आणि राहुल जिम ट्रेनरच्या कामासह मॉडेलिंगही करतात. ते काही काळापर्यंत अॅमेझॉनवरून प्रोटिन पावडर मागवायचे. त्यांनाच म्हणे अनेकदा खऱ्या डब्यात नकली पावडर पाठवण्यात आली आहे. हे समजताच ते डबे कंपनीला रिटर्न करायचे. त्यांनी आरोप केला की पोलीस ज्या डब्यांना हस्तगत केल्याचे दाखवून त्यांच्यावर आरोप करत आहे, ते डबे रिटर्न घेणे अॅमेझॉनने २०१८ पासून बंद केले आहे.