
मुंबई: गौतम सिंघानीया यांच्या लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीने सिंगापूरची खाजगी इक्विटी कंपनी असलेल्या झँडरला ठाणे येथील जेके ग्राम येथील २० एकराचा भूखंड ७१० कोटी रुपयांना विकला आहे. हा भूखंड विकसित करण्यासाठी रिटेलर क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीला आणखी १७०० कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे. सिंघानिया शाळेला लागून असलेल्या रेमंड जंक्शन येथील भूखंडाचा जागेच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचा असल्याचे मानले जात आहे. या जागेवर व्यावसायिक कार्यालयांसह किरकोळ बाजारासाठी संकुल उभारण्याचे कंपनीचे उद्दीष्ट्य आहे. या जागेवर संकुल उभारल्यानंतर वर्षाला २ कोटी ग्राहक भेट देतील अशी अपेक्षा आहे. या संकुलाच्या माध्यमातू कंपनी सुमारे ४००० नोकऱ्या उपलब्ध करणार आहे. कंपनीवर असलेल्या कर्जाचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने ही विक्री कंपनीसाठी अत्यंत दिलासादायक ठरली आहे. रेमण्ड कंपनी जेके इन्व्हेस्टोसोबत या जागेवर कापड गिरणी चालवत होती. या विक्रीच्या व्यवहारातून जेके इन्व्हेस्टोला ५६५ कोटी रुपये मिळणार आहेत. रिअल इस्टेटचा विचार करता ठाण्यातील ही मोठी थेट परदेशी गुंचवणूक आहे, असे रेमण्डचे सीएमडी गौतम सिंघानीया यांनी म्हटले आहे. रेमण्डचा रेमण्ड रियालिटी या प्रकल्पाचे कामही सुरू असून या प्रकल्पाच्या माध्यमातून गृहनिर्माण क्षेत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्यांना एक चांगला पर्याय नक्कीच उपलब्ध होईल असेही सिंघानीया म्हणाले. ठाणे टेक्स्टाइल मीलची स्वातंत्र्योत्तर काळात उभारणी झाली होती. नऊ वर्षांपूर्वी आर्थिक क्षेत्रात बदल झाल्यानंतर कंपनीला ही मील बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर कामगारांची देणी दिल्यानंतर कंपनीला हा भूखंड विकसित करण्याची परवानगी मिळाली.