
मुंबई: बिग बॉसच्या घरात सदस्य आले आणि त्यांच्यामध्ये भांडणं झाली नाहीत तर नवलच... हिंदीतील मध्ये कार्यक्रम सुरु झाल्याच्या काही दिवसातच घरात वाद सुरू झाले आहेत. लेखक आणि अभिनेत्री या दोन सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. बिग बॉसच्या आजच्या भागात सिद्धार्थ आणि रश्मीमध्ये कडाक्याचे भांडण होताना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ घरात कसं वागतो याबद्दल रश्मी इतर सदस्यांशी बोलत असल्यामुळे सिद्धार्थला राग येतो आणि भांडणाला सुरुवात होते. 'आपल्या इंडस्ट्रीमधील मोठे लेखक आपल्यासमोर बसले आहेत' असं म्हणत रश्मी देसाई सिद्धार्थ डेला टोमणा मारते. तू पण आता गेम खेळणं सुरू केलंस असं म्हणत त्यांच्यात शाब्दिक चकमक होते. हा वाद इतक्यावरच संपत नाही.... चिडलेला सिद्धार्थ घरात नव्यानं झालेल्या त्याच्या इतर सदस्य मित्रांना रश्मीच्या या वागण्याबद्दल सांगताना दिसतो. शिवाय, 'रश्मी केवळ २ मालिका करून आली आहे. त्या मालिका पण चालल्या की बंद पडल्या, किती हिट आणि फ्लॉप झाल्या हे कुणाला माहीत नाही. पण ती घरात एखादी मोठी हिरॉइन असल्यासारखीच वावरते' असं म्हणत सिद्धार्थ आपला संताप व्यक्त करतो. त्यामुळे आता हा वाद पुढे किती चिघळणार? हे भांडण किती शिगेला पोहोचणार? घरातील इतर सदस्य कोणाच्या बाजून उभे राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांत मिळणार आहेत.