मातृत्वाची शौर्यगाथा! 'हिरकणी'चा ट्रेलर प्रदर्शित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 14, 2019

मातृत्वाची शौर्यगाथा! 'हिरकणी'चा ट्रेलर प्रदर्शित

https://ift.tt/2B75vWv
मुंबई: आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाचा खोल कडा उतरुन खाली उतरणारी '' कुणाला माहीत नसेल तर नवलच! इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी' असं म्हटलं जातं. पण या गोष्टीला एकच अपवाद ठरली ती हिरकणी! रायगडावर दूध घेवून गेलेल्या हिराला परतायला वेळ झाला. सूर्य मावळला. तोफ डागली गेली... आदेश मिळाला...आणि गडाचे दरवाजे बंद झाले. शिवरायांच्या कडक आदेशामुळं ते सूर्योदयालाच उघडणार होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीत तिचं तान्हं बाळ होतं. बाळाच्या ओढीनं अस्वस्थ झालेल्या त्या माऊलीनं गडाचे दरवाजे उघडण्याची विनंती केली परंतु, सारं निष्फळ! आपल्या बाळाच्या ओढीपोटी या धाडसी मातेनं निर्धार केला तो गड उतरायचा. निमुळत्या कड्यावरून असंख्य संकटांचा सामना करत ही माऊली गड उतरली आणि आपल्या बाळापर्यंत पोहोचली. हिरकणीच्या या धाडसाची कथा आपण अनेकदा ऐकली आहे. ही कथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कपाळावरची चिरी, माने वरचा अंबाडा, कंबरेला खोचलेला पदर आणि आपल्या बाळासाठी जीव ओवाळून टाकायची तयारी असलेल्या धाडसी हिरकणीचा परिचय आपल्या या ट्रेलरमधून होतो. आपल्या बाळासाठी वारा, पाऊस, अंधार, या कशाची तमा न बाळगता ही आई रायगडाच्या कड्याहून खाली उतरायला लागते आणि तिच्यापुढ्यात उभी ठाकलेली संकटं पाहून ट्रेलर पाहताना आपल्या अंगावरही काटा येतो. या शौर्याची गाथा आपल्याला रूपेरी पडद्यावर पाहता येणार असल्याची ग्वाही चित्रपटाचा ट्रेलरमधून देण्यात येते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे आणि सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा लोकांच्या नक्कीच कायमस्वरुपी स्मरणात राहील याची खात्री चित्रपटाच्या टीमला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे आणि राजेश मापुस्कर या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.