राष्ट्रवादीच्या जेलमधील आमदाराचा प्रताप, निवडणूक आयोगाला लाखो रुपयांसह सापडला मित्राच्या घरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 19, 2019

राष्ट्रवादीच्या जेलमधील आमदाराचा प्रताप, निवडणूक आयोगाला लाखो रुपयांसह सापडला मित्राच्या घरीठाणे, 19 ऑक्टोबर : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असेलले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्या सहकाऱ्याच्या घरातून 53 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली ती अशी की तुरुंगात असण्याऐवजी राष्ट्रवादी आमदार रमेश कदमसुद्धा तिथं उपस्थित होते. या प्रकरणी पोलिसांनी घरमालक राजू खरे यांना ताब्यात घेतलं आहे. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

शुक्रवारी रमेश कदम यांना तुरुंगात अस्वस्थ वाटू लागल्यानं जेजे रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. तिथं त्यांची तब्येत ठिक असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रुग्णालयातून ठाणे सेंट्रल जेलला नेण्यात येत होते. यावेळी आमदाराने सोबतच्या पोलिसांना ठाण्यातील घोडबंदर परिसरात एका मित्राकडे घेऊन जाण्यास सांगितलं. पोलिसांनीदेखील तुरुंगात नेण्याऐवजी रमेश कदम यांना मित्राच्या घरी घेऊन गेले.

आमदार रमेश कदम यांना तुरुंगाऐवजी मित्राच्या घरी नेलं जात असल्याची माहिती पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला समजताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर ठाणे पोलिसांचे एक पथक तिथं पोहचलं त्यावेळी आमदार रमेश कदम, घरमालक राजू खरे आणि पोलिस कर्मचारी 53 लाख 43 हजार रुपयांच्या रोख रकमेसह सापडले. याप्रकरणी राजू खरेला शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं आहे. तर रमेश कदम यांची रवानगी ठाणे सेन्ट्रल कारागृहात करण्यात आली आहे. याशिवाय पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

रमेश कदम हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांना अण्णाभाऊ साठे विकास मंडळात घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर 150 कोटी रुपयांच्या व्यवहारात अफरातफरी केल्याचा आरोप असून 2015 मध्ये त्यांना अटक केली होती. यावेळीही ते निवडणूक लढवत आहेत.