Ind vs SA : शाहबाज नदीमच्या प्रतीक्षेला फळ, भारतीय कसोटी संघात पदार्पण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 19, 2019

Ind vs SA : शाहबाज नदीमच्या प्रतीक्षेला फळ, भारतीय कसोटी संघात पदार्पण

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला रांची येथे सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देणार होतं. मात्र शुक्रवारी सरावादरम्यान कुलदीपच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याचं समोर आलं. यासाठी निवड समितीने खबरदारीचा उपाय म्हणून शाहबाज नदीमला भारतीय संघात स्थान दिलं. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारा शाहबाज नदीम २९६ वा खेळाडू ठरला आहे.

रांचीची खेळपट्टी ही फिरकीपटूंना मदत करणारी आहे. यामुळेच अखेरीस शाहबाज नदीमला भारतीय संघात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० वर्षीय शाहबाज नदीमने गेल्या काही हंगामांमध्ये स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळणाऱ्या शाहबाज नदीमने ११० प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ४२४ बळी घेतले आहेत.