
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती २२० जागांचा आकडा पार करेल, असा दावा या पक्षांकडून केला जात असताना महायुतीचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री यांनी वेगळंच मत व्यक्त केलं आहे. 'मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. कुठल्याही निवडणुकीबाबत निश्चित काही सांगणं अशक्य असतं. त्यामुळं महायुती २०० जागांचा आकडा पार करेल असं मला वाटत नाही,' असं जोशी यांनी म्हटलं आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले असता मनोहर जोशी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. जोशी यांनी यावेळी राजकारणाच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं. 'मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. कुठल्याही निवडणुकीतील जागांबाबत ठामपणे योग्य अंदाज लावणं शक्य नसतं. तसं ते आजही नाही, असं सांगतानाच, 'महायुती २०० च्या पुढं जाणार नाही, असं ते म्हणाले. शिवसेनेचं युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतही मनोहर जोशी यांनी मत मांडलं. ते म्हणाले, मी पक्षाच्या शिस्तीत राहणारा माणूस आहे. त्यामुळं पक्षाच्या विरोधात मी कधी बोलत नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र महत्त्वाच्या पदावर येणार हे उघड आहे. मात्र, ते कोणतं पद घेणार, हे आताच सांगता येणार नाही. 'मुख्यमंत्रिपदाचं म्हणाल तर मुख्यमंत्री कोणाही होऊ शकतो. लोकशाहीचं ते वैशिष्ट्य आहे. निवडून येणारी कोणतीही व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते,' असं सांगतानाच, 'भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईलच,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.