भिकाऱ्याच्या झोपडीत पावणे दोन लाखाची नाणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 7, 2019

भिकाऱ्याच्या झोपडीत पावणे दोन लाखाची नाणी

https://ift.tt/31NLuQF
: लोकलच्या धडकेत मृत पावलेल्या एका भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये तब्बल पावणे दोन लाख रुपयांच्या नाणी, ८ लाख ७७ हजार रुपये रुपयांचे फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट तसेच बँक खात्यामध्ये ९६ हजाराची रक्कम आदी मालमत्ता आढळून आली आहे. या भिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर त्याची ओळख पटविण्यासाठी त्याच्या गोवंडी येथील झोपडीत गेलेल्या वाशी रेल्वे पोलिसांच्या हाती ही सर्व मालमत्ता लागली आहे. एका भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये इतकी मोठी मालमत्ता पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भिकाऱ्याचे नाव बिरंदीचंद पनारामजी आजाद (७५) असे असून तो टाटानगर गोवंडी भागातील झोपडीत एकटाच राहत होता. मुळचा राजस्थानचा असलेल्या बिरंदीचंद आजाद हा गोवंडी रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवित होता. गत ४ ऑक्टोबर रोजी बिरंदीचंद हा गोवंडी मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडून जात असताना, त्याला लोकलची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटोळी आणि हेड कॉन्सेटबल पाटील यांनी मृत बिरंदीचंद याच्या फोटोवरुन त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला असता, तो गोवंडी परिसरात भीक मागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक माहिती मिळवून टाटानगर गोंवडी येथील त्याची झोपडी शोधून काढली. बिरंदीचद आजाद याच्या फोटोवरून शेजाऱ्यांनी त्याची ओळख पटवून तो बऱ्याच वर्षापासून एकटाच रहात असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र त्याचा नाव पत्ता त्यांना देखील माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी बिरंदीचंद याची ओळख पटविण्यासाठी त्याच्या झोपडीत कागदपत्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना सदर झोपडीमध्ये बिरंदीचंद याने भीक मागून जमा केलेले तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांच्या नाण्याने भरलेल्या चार गोण्या सापडल्या. त्याचप्रमाणे ८ लाख ७७ हजार रुपयांची फिक्स डिपॉजिट सर्टिफिकेट, तसेच त्याच्या बँक खात्यावर ९६ हजाराची रक्कम जमा असल्याचे आढळून आले. त्याशिवाय त्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे देखील पोलिसांच्या हाती लागली. बिरंदीचंद आजाद याने गोवंडी रेल्वे स्थानकाजवळ भीक मागून इतकी मालमत्ता कमावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी राजस्थान येथील त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर सस्ते यांनी दिली.