चिदंबरम पिता-पुत्रावर आरोपपत्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 19, 2019

चिदंबरम पिता-पुत्रावर आरोपपत्र

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी दिल्ली न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, पीटर व इंद्राणी मुखर्जी यांच्यासह १४ जणांचा समावेश या आरोपपत्रात करण्यात आला आहे. या प्रकरणात आता विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहार यांच्या न्यायालयात २१ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
'सीबीआय'च्या आरोपपत्रात चार्टर्ड अकाऊंटंट एस. भास्करामन, नीती आयोगाच्या माजी सीईओ सिंधुश्री खुल्लर, लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाचे माजी सचिव अनुप पुजारी, प्रबोध सक्सेना, रवींद्र प्रसाद आदींच्या नावाचा समावेश आहे. पी. चिदंबरम याच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून, त्यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. अंमलबजावणी संचालनालयानेदेखील (ईडी) चिदंबरम यांना तुरुंगातच अटक करून चौकशी केली होती. २१ ऑगस्टला त्यांना अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिने ते सीबीआय आणि न्यायालयीन कोठडीत आहेत. 'आयएनएक्स' गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने १५ मे २०१७ रोजी एफआयआर दाखल केला होता.
पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांचीदेखील या आरोपपत्रात नावे आहेत. माजी पती-पत्नी असलेले हे दोघे सध्या मुंबईच्या ऑर्थररोड आणि भायखळा तुरुंगात आहेत. शीना बोरा हायप्रोफाइल हत्याकांड प्रकरणात सीबीआय न्यायालयात त्यांच्यावर खटला सुरू आहे. इंद्राणी मुखर्जी आयएनएक्स मीडियाची संचालक होती. त्यामुळे दोघांवर या कथित भ्रष्टाचार प्रकरणाला मंजुरी दिल्याचा आरोप आहे.
काय आहे आयएनएक्स प्रकरण?
आयएनएक्स मीडियाने नियमांचे उल्लंघन करून आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ टक्के गुंतवणूक करताना परकी गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. यामुळे फक्त ४.६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकी गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली. प्राप्तिकर खाते आणि महसूल विभागाने या प्रकरणात कंपनीला नोटीसही बजावली. मात्र, त्या वेळी कार्ती चिदंबरम कंपनीच्या मदतीला धावून आले, असे सांगितले जाते. त्यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या पदाचा वापर करून कंपनीला नव्याने परवानगी मिळवून दिली. त्या वेळी पी. चिदंबरम हे अर्थमंत्री होते. या मोबदल्यात कार्ती यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये साडेतीन कोटींहून अधिक रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे.