अमरावती: बडनेरा येथे दिवाळीनिमित्त बडनेरा जवळील मधुबन वृद्धाश्रमात बडनेऱ्याचे यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणमारी झाली. या वृद्धाश्रमात आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्यात वाद झाल्यानंतर ही हाणामारी झाल्याचे समजते. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा दिवाळी निमित्त दरवर्षी बडनेऱ्याजवळ असलेल्या मधुबन या वृद्धाश्रमात कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमात ते मिठाई, फळे आणि कपडे वाटपाचे काम करतात. याहीवर्षी त्यांनी वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, त्याच वृद्धाश्रमात शिवसेनेनेही तशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश बुब समोरासमोर आले आणि त्यांच्या बोलणे झाले. त्याचे रुपांतर वादात झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. यावेळी संतप्त झालेल्या आमदार रवी राणा यांनी माईक देखील उगारला. हा वाद नेमका कशामुळे झाला ते मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीतील वाद पुन्हा उफाळून वर येत असल्याची चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश बुब यांनी राणा यांना शिवीगाळ केल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.