
जालनाः तालुक्यातील भागडे सावरगाव या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोनदेव या गावात वीज कोसळून दोन महिला जखमी झाल्या आहेत. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळपासून जालना तालुक्यासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोराचा पाऊस पडत होता. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या तीन महिलांच्या अंगावर वीज कोसळली. भागडे सावरगाव आणि सेवलीमधील तीन पुरुष व्यक्तीवर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. भागडे सावरगावमधील गयाबाई गजानन नाईकनवरे (वय ३५), सेवली येथील संदीप शंकर पवार (वय ३०), आणि मंदाबाई नागोराव चाफळे (वय ३५) या तिघांचा यात मृत्यू झाला आहे. तर सुमनाबाई साहेबराव नाईकनवरे (भागडे सावरगाव), सुनील संदीप पवार (सेवली), सचिन नागोराव चाफळे (सेवली) हे तिघे जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सेवली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पार्थिव शवविच्छेदनासाठी सेवली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती सेवलीचे सपोनि. विलास मोरे यांनी दिली आहे.