जळगाव: 'भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना न्याय मिळतो. दत्तक व सावत्र पुत्रांना न्याय मिळतो, मग मी तर पक्षातच जन्माला आलोय. १९८० पासून पक्षाच्या स्थापनेपासून काम करतोय. इथंच लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पक्ष मला दूर लोटणार नाही. नक्कीच न्याय देईल,' अशी आशा भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून खडसे यांना तिकीट नाकारून त्यांच्या कन्या रोहिणी यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. गेल्या ३० वर्षांपासून मतदारसंघ ताब्यात ठेवणाऱ्या खडसे यांना हा मोठा धक्का होता. पक्षानं माझं ऐकलं नाही अशी भावना त्यांनी पराभवानंतर व्यक्त केली होती. सोमवारी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत गप्पा मारताना त्यांनी पुन्हा एकदा मनमोकळेपणानं आपल्या भावना बोलून दाखवल्या. 'मला माझ्या पक्षाकडून अजूनही आशा आहे, असं ते म्हणाले. भाजप-शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या संघर्षावरही त्यांनी भाष्य केलं. 'देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच तसं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं अगोदर ठरलं आहे तसंच होईल. नितीन गडकरी मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असं ते म्हणाले. आत्मचरित्र लिहिणार 'सध्या माझ्याकडे भरपूर वेळ आहे. माझी इच्छा आहे की काहीतरी लिहिलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या समोर आलेल्या नाहीत. सुरेश जैन माझे कट्टर विरोधक असतानाही ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांना मुंबईला घेऊन गेलो होतो. हे फक्त गडकरींना माहीत आहे. राज्याच्या राजकारणावर त्या-त्या वेळी परिणाम करणारे असे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. त्यावर एक उत्तम पुस्तक होऊ शकेल, असं सांगून, पुढील काळात आपण आत्मचरित्र लिहिणार असल्याचे संकेत खडसे यांनी दिले.