अमरावती: मोर्शीत उमेदवाराची कार पेटवली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 21, 2019

अमरावती: मोर्शीत उमेदवाराची कार पेटवली

https://ift.tt/2J2UNoz
अमरावती: राज्यात मतदानाला सुरुवात झाली असतानाच, अमरावतीतील मोर्शी विधानसभा मतदारसंघात जाळपोळ आणि मारहाणीची घटना घडली आहे. महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांना अज्ञातांनी मारहाण केली. तसंच त्यांची कारही पेटवून दिली. या घटनेमुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मोर्शी मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार हे सकाळी कारमधून मालखेड गावाकडून निघाले होते. वरुडपासून सहा किलोमीटरवर असलेल्या एका गावाजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. तीन ते चार जणांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळते. तीन-चार जणांनी त्यांची कार अडवली आणि त्यांच्यावर हल्ला केला. भुयार यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांची कार पेटवून देण्यात आली. रस्त्यावर सुरू असलेला हा प्रकार पाहून गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ते धावून येताच मारेकऱ्यांनी जवळच्या शेतातून पळ काढला. भुयार यांची कार जळून खाक झाली आहे. तसंच भुयार यांना जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 'भुयार यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. तसंच त्यांची कार पेटवून देण्यात आली. दरम्यान, भुयार यांच्या दिशेनं गोळीबारही करण्यात आल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. भुयार यांच्यावर गोळीबार झाला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. भुयार यांना मारहाण करून त्यांची कार पेटवून दिल्याचं समजताच रस्त्यावर मोठ्या संख्येनं गावकरी जमले होते. तसंच त्यांचे समर्थकही त्या ठिकाणी आले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. मोर्शी मतदारसंघात अशा प्रकारे राजकारण करण्याची संस्कृती नाही. स्वाभिमानी पक्षाचा हा स्टंट आहे. असा प्रकार घडलेला नाही. हल्ला झाल्याचे नाटक केले आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी नाटकं सुरू झाली आहेत. कुठेच प्रतिसाद मिळत नाही हे बघून कार जाळली. गोळीबार केला अशा अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. मोर्शीमध्ये असे प्रकार कधी झालेले नाहीत. कधीही होत नाहीत. सहानुभूतीला थारा देऊ नये, अशी प्रतिक्रिया भाजप उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. 'त्यांनी कार स्वतःच पेटवून दिल्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लोकांना तशी सवय आहे. या संघटनेत मी गेली अनेक वर्षे काम केलेलं आहे. मी या संघटनेतील लोकांना चांगलं ओळखतो. स्टंटबाजी करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असं सदाभाऊ खोत म्हणाले.