मुंबई: हिंदुत्वाचे राजकारण करणारा पक्ष आता सर्वसमावेश झाला असून सत्तास्थापनेसाठी शिवसनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा,अशी विनंती करणारे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाठवले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता याचीही आठवण दलवाई यांनी सोनिया गांधी यांना केली आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये दोन मते असून सोनिया गांधी यांच्याशी यासंदर्भात होणाऱ्या चर्चेनंतरच काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे. वाचा- 'भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा लागेल' एका खासगी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर हे सरकार ५ वर्षे टिकेल असे प्रयत्न व्हायला पाहिजेत असेही दलवाई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. एका खासगी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणे आवश्यक असल्याचेही हुसेन दलवाई यांनी अधोरेखित केले आहे. दरम्यान, काँग्रेसपक्षात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेना हा हिंदुत्वाचे राजकारण करणारा पक्ष असून काँग्रेस पक्षाने राज्याच्या राजकारणात शिवसेनेला कायम विरोध दर्शवला आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला होता. वाचा- तसेच, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेनेसोबत सरकार स्थापण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेनं काँग्रेसला जो कौल दिला आहे, त्यानुसार काँग्रेस विरोधी बाकावरच बसणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा किंवा कसे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांच्या महाराष्ट्रातील निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. मात्र सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जायचे की नाही? याबाबत बोलण्यास काँग्रेसच्या या शिष्टमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवसेनेबरोबर काँग्रेस जाणार की नाही? याचे गुढ वाढले आहे.