रोहित शर्मा ठोकणार विक्रमांचा 'षटकार' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 10, 2019

रोहित शर्मा ठोकणार विक्रमांचा 'षटकार'

https://ift.tt/2K7YVnD
नागपूर: षटकार ठोकण्यासाठी मजबूत शरीरयष्टी नव्हे, तर अचूक टायमिंग साधता आलं पाहिजे, असं सांगणारा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माला नागपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी-२० सामन्यात विक्रमांचा 'षटकार' ठोकण्याची संधी आहे. आतापर्यंत ही 'विराट' कामगिरी जगातील दोनच फलंदाजांनी केली आहे. भारत-बांगलादेश यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. १-१ ने बरोबरीत असलेल्या या मालिकेतील तिसरा सामना नागपूरमध्ये होणार आहे. दुसऱ्या सामन्यात तडाखेबंद खेळी करणाऱ्या रोहित शर्माकडे या लढतीत विक्रम रचण्याची मोठी संधी आहे. एक मोठा विक्रम त्याच्या नावावर होणार आहे. जगातील दिग्गज क्रिकेटपटू या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नशील असतात. आतापर्यंत फक्त दोघांनाच ही कामगिरी करता आलेली आहे. हा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरणार आहे. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) ३९८ षटकार ठोकले आहेत. नागपूरच्या टी-२० सामन्यात दोन षटकार ठोकल्यास त्याचे ४०० षटकार होतील आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा आणि भारतातील पहिला फलंदाज ठरेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी फक्त दोघांनीच केली आहे. भारताच्या एकाही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल यांच्या नावावर ४०० हून अधिक षटकारांचा विक्रम आहे. ख्रिस गेलनं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये ५३४ षटकार लगावले आहेत. तो सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे. शाहिद आफ्रिदी याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४७६ षटकार ठोकले आहेत. रोहित शर्मानं आज दोन षटकार लगावून ४०० चा आकडा गाठला तर, तो जगातील तिसरा फलंदाज ठरणार आहे. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये २३२ षटकार, कसोटीमध्ये ५१ षटकार आणि टी-२० मध्ये ११५ षटकार लगावले आहेत. राजकोटमधील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतानं बांगलादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. हंगामी कर्णधार रोहित शर्मा याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला होता. रोहितनं अवघ्या ४३ चेंडूत ८५ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यात सहा चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. सामन्यानंतर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनं घेतलेल्या खास मुलाखतीत रोहितनं षटकारांचं गमक सांगितलं होतं. 'षटकार ठोकण्यासाठी मजबूत शरीरयष्टी आणि पीळदार स्नायू लागतात असं नाही. चहलही षटकार ठोकू शकतो. त्यासाठी अचूक टायमिंग लागतं. तुमचं डोकं स्थिर पाहिजे आणि चेंडू बॅटच्या मधोमध घेता आला पाहिजे. अशा अनेक गोष्टीची गरज लागते,' असं तो म्हणाला होता.