मुंबई: कुलाबा येथील वादग्रस्त आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची अंमलबजावणी संचलनालयाकडून पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. हा उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता काँग्रेसचा समावेश असलेल्या महाआघाडीचं नवं सरकार स्थापन होत आहे. या नव्या सरकारमध्ये अशोक चव्हाण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढू शकतात, असं मानलं जात आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीचे नवे सरकार स्थापन होत आहे. उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण हे देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. चव्हाण यांना आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता मंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. ईडीनं आदर्श घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. ईडीचे अधिकारी बुधवारी कुलाबा येथे आदर्श गृहनिर्माण संस्थेत पोहोचले आणि त्यांनी फ्लॅटमधील मोजणीही केली. याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं असलं तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, या गृहनिर्माण संस्थेविरोधात कारवाईसाठी मालमत्तेची माहिती घेतली.
सोसायटीतील पदाधिकाऱ्यांचा विरोध कुलाबामध्ये मोक्याच्या जागेवर उभारलेल्या ३१ मजली टॉवरमध्ये नोकरशहा, राजकीय नेते आणि सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत. या गृहनिर्माण सोसायटीतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर फ्लॅटधारकांनाही आरोपी करण्यात आले. या प्रकरणी सीबीआयनं अशोक चव्हाण यांनी आरोपी केले. त्यांना या प्रकरणामुळं मुख्यमंत्रिपदही सोडावे लागले होते. अन्य राजकीय नेत्यांचीही चौकशी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी मोजणीचं साहित्य आणि उपकरणं घेऊन या गृहनिर्माण संस्थेत पोहोचले आणि त्यांनी अनेक मजल्यांवरील फ्लॅटमध्ये मोजणीही केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या पंधरवड्यात दुसऱ्यांदा चौकशी केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी परिसरात येण्याच्या १५ दिवस आधी पूर्वसूचना द्यावी, असे पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे ईडीला सांगितलं होतं.