मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे अधिकृत नेते कोण, यावरून निर्माण झालेला संभ्रम आजही कायम आहे. हेच राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेते असल्याचा दावा भाजपनं केला असला तरी विधीमंडळाच्या रेकॉर्डवर यांच्या नावाची नोंद झाल्याची माहिती पुढं येत आहे. मात्र, अद्याप काहीही स्पष्ट झालं नाही. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीला विरोध करून स्वपक्षाविरोधात बंड करणाऱ्या अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपसोबत सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी त्यांनी गटनेता या नात्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र राज्यपालांना दिलं होतं. मात्र, अजित पवारांचा निर्णय पक्षाच्या विरोधात आहे, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांची पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी जयंत पाटील यांची गटनेतेपदी निवड केली. विधीमंडळात त्यांच्याच नावाची नोंद झाल्याची माहिती आता पुढं येत आहे. त्यामुळं विधानसभेत त्यांचाच 'व्हिप' चालणार, असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. मात्र, भाजपनं त्याचं खंडन केलं आहे. 'अजित पवार यांना गटनेते म्हणून मान्यता मिळालीय. त्यांनी दिलेल्या पत्राच्या आधारेच त्यांचा शपथविधी झाला आहे. जयंत पाटील यांनी आता सादर केलेलं पत्र हा केवळ प्रतिदावा आहे. त्यांची नोंद झालेली नाही,' असं भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितलं. त्यामुळं संभ्रम वाढला आहे.