अयोध्या: पुण्यात दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2019

अयोध्या: पुण्यात दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी

https://ift.tt/2O0wY2u
पुणे अयोध्या खटल्यावर सुप्रीम कोर्ट आज निकाल जाहीर करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर सकाळच्या सत्रातील शाळा केवळ सकाळी १० वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. अयोध्या खटल्याच्या निकालाचं गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण देशभरात आज ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनीही देशातील जनतेला सुप्रीम कोर्ट देईल तो निर्णय मान्य करण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-काश्मिरातील शाळांना याआधीच सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पुण्यात जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या सुचनेनुसार सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात भरण्यात आलेल्या शाळा १० वाजता सोडून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना आज शाळेत येऊ नये असे मेसेज देण्यात यावा, तथापि काही विद्यार्थी नियोजित वेळेत शाळेत येण्याची शक्यता असते त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पाठविण्यात येण्याच्या सूचना देण्यासाठी मुख्याध्यापकांनी दुपार सत्राचे नियोजन करावे , आलेले सर्व विद्यार्थी घरी जातील याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्याधापकांना देण्यात आले आहेत. अयोध्या खटल्यावर आज सकाळी दहा वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे पाच सदस्यीय पीठ निकालाचे वाचन करणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातल्या अलिगड येथील इंटरनेट सुविधा खबरदारीसाठी खंडीत करण्यात आली आहे. तर कोणत्याही प्रकारचे धार्मिक तेढ पसरवणारे मेसेज पोस्ट करण्यापासून देशभरात बंदी घालण्यात आली आहे. त्यासंबंधीचे काही नियम कोर्टाने आखून दिले आहेत.