मुंबई राज्यात शिवसेना-भाजपमधला सत्ता स्थापनेचा तिढा आता विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत 'सामना'तून भाजपवर टीकास्त्र सुरू ठेवले असताना आता 'तरुण भारत' या दैनिकातून संजय राऊत यांच्यावर जहरी टीका करण्यात आली आहे. तरुण भारतच्या अग्रलेखात संजय राऊत यांना 'बेताल' आणि 'विदूषक' संबोधण्यात आलं आहे. त्यामुळे सेना-भाजपमधला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 'पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही. पण, राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही', अशी जहरी टीका शिवसेनेवर करण्यात आली आहे. 'उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांशी असलेले घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना हा बेताल शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे', अशी टीका संजय राऊत यांच्यावर करण्यात आली आहे. 'तरुण भारत'च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे... >> माध्यमांमध्ये फडणविसांच्या एकाकीपणाबाबत कितीही बातम्या पेरल्या, तरी त्यातून महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. अर्थात ‘विदूषक’ म्हणून आपल्याकडून हेच अपेक्षित आहे. >> एका ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल? >> सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप कुठल्याही क्षणी दावा करू शकतो आणि शपथविधी सुद्धा लगेच होऊ शकतो. बहुमत वगैरे पुढच्या हिवाळी अधिवेशनात सिद्ध करता येईल. >> रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी ९ वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवसभर मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची? >> ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? अलिकडे रोज सकाळी ‘टिवटिव’ करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो. >> शेतकर्यांबाबत सर्वाधिक पुळका आणण्याचा आव शिवसेनेचाच, राममंदिरासाठी सुद्धा लढा दिल्याचा दावा शिवसेनेचाच. या अनेक प्रश्र्नांमध्ये आणखी एक प्रश्र्न महाराष्ट्राच्या मनात घोंगावतोय, तो मराठी बाण्याचा.