म. टा. प्रतिनिधी मुंबई: करोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई लोकलमध्ये अधिकृत मास्क विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना अवघ्या ५ रुपयांत मास्क उपलब्ध होणार आहे. एप्रिलपासून मुंबईकरांना हे मास्क खरेदी करता येतील. मुंबईतील करोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांमध्ये मध्य रेल्वेने अनोख्या पद्धतीने सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. के. के. विद्युत लिमिटेड या खासगी कंपनीच्या मदतीने धावत्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. दोन प्रकारचे मास्क विक्रीसाठी असणार असून, त्यांची किंमत अनुक्रमे ५ आणि ७ रुपये असणार आहे. एफडीए प्रामाणित हे मास्क असून एकदा वापरण्यायोग्य आणि पुन्हा वापरण्यायोग्य असे हे मास्क असणार आहेत. वाचा: मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या तिन्ही मार्गावर लोकलमध्ये मास्क विक्री करण्यात येईल. रेल्वे स्थानकांवर स्टॉल उभारल्यानंतर त्या स्टॅालवर खरेदी करण्यास प्रत्येक प्रवाशांला शक्य होईल असे नाही. यामुळे धावत्या लोकलमध्ये मास्क विक्रीसाठी २५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मास्क विक्री सुरू करण्यात येईल, असे के. के. विद्युतचे केशव काळे यांनी सांगितले. धावत्या लोकलमध्ये, रेल्वे स्थानक परिसर, पादचारी पूल या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांकडून मास्क विक्री केली जाते. अनेकदा रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस येण्याची चाहूल लागताच अनधिकृत फेरीवाले काही वेळेसाठी पसार होतात. त्यांची पाठ फिरताच पुन्हा आपले बस्तान बसवतात. वाचा: करोना काळात प्रवासी संख्येत घट होत असल्याने उत्पन्नाचे नवे पर्याय शोधण्यात येत आहे. रेल्वे मंडळाच्या 'एनएफआर' अंतर्गत या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. एक वर्ष मास्क विक्रीच्या परवानगीमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत ६० हजार रु.ची भर पडणार आहे. करोना संसर्ग रोखण्याचे सर्व नियम पाळून लोकलमध्ये अधिकृत मास्क विक्रीला परवानगी देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.