
मुंबई : सलामीवीर फलंदाज क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे त्याला क्रिकेटपासून आठ महिने दूर राहण्याची शिक्षा झाली. 'माझी दुसरी इनिंग ही २.० असेल' अशी ग्वाही पृथ्वी शॉने दिली. २० व्या जन्मदिनाच्या दिवशी त्याने ट्विटरवर सराव करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं. ‘आगामी सय्यद मुश्ताक अली चषकासाठी पृथ्वी शॉच्या निवडीबाबत चर्चा होऊ शकते’, अशी माहिती मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी दिली. ‘पृथ्वी शॉ १६ नोव्हेंबरपासून खेळण्यासाठी मोकळा आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत मी आश्वस्त करु शकत नाही, मात्र त्याच्या निवडीवर चर्चा नक्कीच होईल’, असं ते ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’शी बोलताना म्हणाले. वाचा : रेगे यांच्या समितीने मुंबईचा संघ फक्त पहिल्या तीन सामन्यांसाठी जाहीर केला आहे. कारण, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे यांसारखे महत्त्वाचे खेळाडू सध्या भारतीय टी-२० संघात बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहेत. पृथ्वी शॉच्या कारवाईचा अवधी पूर्ण होण्याच्या अगोदर मुंबई सातपैकी सहा सामने खेळणार आहे. खोकल्यासाठी प्रतिबंधित औषध अनावधानाने घेतल्यामुळे पृथ्वी शॉवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली होती. इंदूरमध्ये सय्यद मुश्ताक अली चषकातील २२ फेब्रुवारी २०१९ रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या वेळी पृथ्वी शॉने जी सॅम्पल पुरवली, त्यात प्रतिबंधित औषधाचा घटक आढळला होता. वाचा : १६ जुलै रोजी डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पृथ्वी शॉवर कारवाई करण्यात आली. मात्र आपण खोकल्यासाठी अनावधानाने हे औषध घेतल्याचं पृथ्वी शॉने सांगितलं होतं. पृथ्वी शॉने दिलेल्या उत्तराने आपण समाधानी असल्याचंही बीसीसीआयने स्पष्ट केलं. पहिल्याच कसोटी अनेक विक्रम मोडीत पृथ्वी शॉने पदार्पणाच्या कसोटीत अनेक विक्रम मोडीत काढले होते. त्याने ९९ चेंडूत पहिलं शतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या कसोटीत एवढं वेगवान शतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. तर ड्वेन स्मिथनेही ९३ चेंडूतच पदार्पणाच्या कसोटीत शतक पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. सर्वात तरुण वयात शतक पूर्ण करण्यासह पृथ्वी शॉने अनेक विक्रम नावावर केले. मात्र यानंतर काहीच दिवसात त्याच्यावर बंदीची कारवाई झाल्यामुळे त्याला क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. आता सय्यद मुश्ताक अली चषकातून संधी मिळाल्यास पृथ्वी शॉला पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावण्याची संधी मिळणार आहे.