नागपूर/मुंबई: महाराष्ट्राच्या राजधानीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचं सरकार स्थापन होत असताना महाराष्ट्राच्या उपराजधानीत माजी मुख्यमंत्री यांच्या घरी मात्र नोटीस आली आहे! नागपूरच्या स्थानिक कोर्टाने त्यांना समन्स बजावले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी त्यांच्यावरील दोन गुन्हेगारी खटले असल्याची माहिती लपवल्याबाबत त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. गुरुवारी २८ नोव्हेंबरला नागपूर पोलिसांनी फडणवीस यांच्या घरी समन्स पोहोचवला आहे. समन्स बजावल्याची माहिती नागपूरचे पोलीस निरीक्षक महेश बनसोड यांनी दिल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. फडणवीस यांच्याविरोधात १९९६ आणि १९९८ मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांसंदर्भात गुन्हे दाखल झाले होते. मात्र या दोन्ही आरोपांची निश्चिती झाली नव्हती. पण या गुन्ह्यांविषयीची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात न लिहिल्याने नागपूरमधील वकील सतीश उके यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. फडणवीस यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला चालवण्यीची उके यांची मागणी होती. मुंबई उच्च न्यायालयाने उके यांची याचिका फेटाळून लावत फडणवीसांना दिलासा दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागपूरच्या दंडाधिकारी न्यायालयाने १ नोव्हेंबर रोजी याचिकेवर पुन्हा सुनावणीस सुरुवात केली होती. ४ नोव्हेंबरला फडणवीसांना नोटीस जारी केली होती. या नोटीशीला ४ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश होते. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत.