झारखंड: हेमंत सोरेन यांचा शुक्रवारी शपथविधी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 24, 2019

झारखंड: हेमंत सोरेन यांचा शुक्रवारी शपथविधी

https://ift.tt/2PSHkn9
रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून येत्या २७ डिसेंबर रोजी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन शपथ घेणार आहेत. यावेळी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदासह ५ मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी हेमंत सोरेन यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी जेएमएमचे ६, कांग्रेसचे ५ आणि आरजेडीच्या १ मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सोरेन मंत्रिमंडळात एकूण १२ मंत्री शपथ घेणार आहेत. या शिवाय काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपदही मिळणार आहे. दरम्यान, हेमंत सोरेन आज किंवा उद्या राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत जेएमएम-काँग्रेस-राजद आघाडीने ४७ जागा जिंकल्या आहेत. यात जेएमएमने ३०, काँग्रेसने १६ आणि राजदने एका जागेवर विजय मिळविला आहे. तर सत्ताधारी भाजपला केवळ २५ जागा जिंकता आल्या आहेत. जेव्हीएम(पी)ला ३ आणि एजेएसयूपीला २ जागांवर विजय मिळाला आहे. झारखंडमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागले आहेत. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही विजय मिळवता आला नाही. जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी रघुवर दास यांचा पराभव केला. दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाची धुरा सांभाळणारे हेमंत सोरेन यांनी भाजपच्या नाकीनऊ आणले. सोरेन यांनी दुमका आणि बरहेट या दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला. दोन्ही मतदारसंघांत त्यांनी भाजपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. झारखंडमध्ये पाच टप्प्यांत निवडणुका झाल्या. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी पाच वेळा झारखंडच्या विविध भागांचा दौरा केला. पंतप्रधानांनी नऊ विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या यापैकी सहा जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला तर चार ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले.