
'होय, मी आहे ... मी आहे अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट....' वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' नाटकाच्या, धी गोवा हिंदू असोसिएशनने सादर केलेल्या पहिल्या प्रयोगात मराठी रंगभूमीवर हा बुलंद आवाज दुमदुमला आणि मराठी प्रेक्षक अंतर्बाह्य थरारले! गणपतराव जोशी, नानासाहेब फाटक, केशवराव दाते अशा अनेक नटसम्राटांच्या मांदियाळीत स्वत:चे नाव आपल्या कर्तृत्वाने कोरून एका नवा 'नटसम्राट' मराठी रंगभूमीवर अवतरला होता. त्याचं नाव होतं डॉ. . या 'तुफाना'नं पुढील पाच दशके मराठी रंगभूमी आपल्या अस्तित्वानं केवळ उजळूनच टाकली असं नाही, तर तिला एक नवी उंची प्राप्त करून दिली. सातारा जिल्ह्यात १६ नोव्हेंबर १९२७ रोजी बाळकृष्ण व सत्यभामा या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या या मुलानं पुण्यातील भावे स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर होण्यासाठी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनातही त्यांच्या नाट्यप्रेमाची झलक सहाध्यायींना दिसली होती. कॉलेजमध्ये अनेक नाटकांतून त्यांनी काम केलं. एमबीबीएस पदवी मिळविल्यानंतर ईएनटी सर्जन म्हणून त्यांनी पुण्यात रीतसर प्रॅक्टिस सुरू केली. मात्र, नाट्यप्रेम स्वस्थ बसू देत नव्हतं. पुण्यात प्रा. भालबा केळकर यांच्या 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन' या संस्थेचं तेव्हा प्रस्थ होतं. डॉ. लागू या संस्थेत सहभागी झाले. ''च्या अनेक नाटकांतून त्यांनी कामं केली. डॉ. लागू अत्यंत प्रखर बुद्धिवादी, प्रज्ञावान होते. पॉल म्युनी या अभिनेत्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांचं वाचनही अफाट होतं. त्यातूनच प्रत्येक भूमिकेची त्यांची अशी स्वत:ची बैठक असे आणि अत्यंत विचारपूर्वक ते ती भूमिका साकारत असत. पुण्यात 'पीडीए' आणि मुंबईत विजया मेहता, अरविंद देशपांडे प्रभृतींची 'रंगायन' या दोन्ही संस्था तेव्हा जोरात होत्या. डॉ. लागू यांनी 'रंगायन'च्याही अनेक नाटकांतून कामं केली. साठच्या दशकात त्यांचं आयुष्य मेडिकल प्रॅक्टिस आणि आठवड्याच्या अखेरीला नाटकांचे प्रयोग असं धावपळीत सुरू होतं. मधल्या काळात ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंड आणि कॅनडाला रवाना झाले. त्यानंतर काही काळ ते आफ्रिकेतील टांझानिया या देशातही होते. या सर्व काळात त्यांना मराठी रंगभूमीपासून आपण लांब आहोत, याची खंत जाणवत होती. इंग्लंडमध्ये त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग पाहिले. त्यांचं नाट्यविषयक चिंतन सतत सुरूच होतं. अखेरीस टांझानियाच्या किलिमांजारो या पर्वतावर गिर्यारोहण करायला गेले असताना, त्यांना आपण पूर्णवेळ थिएटरच केलं पाहिजे, असा साक्षात्कार झाला. त्यानंतर ते तडक मुंबईला परतले आणि त्यांनी पूर्णवेळ नाटकाला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सुदैवानं त्यांना रामकृष्ण नाईक यांच्या 'धी गोवा हिंदू असोसिएशन' या संस्थेकडून आमंत्रण आलं. नाटक होतं वि. वा. शिरवाडकर यांनी 'किंग लिअर'वरून साकारलेलं 'नटसम्राट'! या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका डॉ. लागूंना प्रचंड आव्हानात्मक वाटली. त्यांनी तातडीनं हे नाटक स्वीकारून तालमी सुरू केल्या. मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात २३ डिसेंबर १९७० रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि मराठी रंगभूमीवर खरोखरचा नवा 'नटसम्राट' अवतरला... डॉ. लागूंनी यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. एकापाठोपाठ एक आलेल्या त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी मराठी रसिकाला तृप्त केले. 'काचेचा चंद्र', 'हिमालयाची सावली', 'गिधाडे', 'सूर्य पाहिलेला माणूस' अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. 'नटसम्राट'नंतर व्ही. शांताराम यांनी डॉ. लागूंना आपला नवा चित्रपट करण्याची ऑफर दिली. हा चित्रपट होता - 'पिंजरा'. हा चित्रपट १९७२ मध्ये प्रदर्शित झाला आणि लागूंची लोकप्रियता प्रचंड वाढली. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील संवादफेक, उंचेपुरे-देखणे व्यक्तिमत्त्व आणि भूमिकेवरची जबरदस्त पकड यामुळे डॉ. लागू लवकरच महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रमुख रंगकर्मी ठरले. 'पिंजरा'पाठोपाठ डॉ. जब्बार पटेल यांच्या 'सामना' या ऐतिहासिक चित्रपटात ते निळू फुलेंसारख्या जबरदस्त अभिनेत्यासमोर उभे ठाकले आणि हा 'सामना' भलताच रंगतदार ठरला. 'सामना'पाठोपाठ आलेल्या 'सिंहासन'मध्येही त्यांनी विश्वासराव दाभाडे या मंत्र्यांची भूमिका तडफेनं साकारली. अभिनय करता करता त्यांनी विलक्षण सामाजिक भानही जपले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. बाबा आढाव, सदाशिव अमरापूरकर यांच्यासह त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलला. नव्वदच्या दशकात सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी 'सामाजिक कृतज्ञता निधी' सुरू करण्याची कल्पना या दिग्गजांच्या मनात आली. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या 'लग्नाची बेडी' या विनोदी नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करून, त्यातून पैसे उभे करून महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक बळ दिले. '' हे त्यांचे वाक्य प्रचंड गाजले. बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी डॉ. लागूंनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. 'सखाराम बाइंडर' आणि 'घाशीराम कोतवाल' या दोन्ही नाटकांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कायमच लढा दिला. विजय तेंडुलकर यांचे 'गिधाडे' हे वेगळ्या वाटेवरचे नाटक रंगमंचावर आणण्याचे आणि त्याचे नेटाने प्रयोग करण्याचे श्रेयही नि:संशय त्यांचेच. श्याम मनोहर यांचे 'प्रेमाची गोष्ट?' आणि मकरंद साठे यांचे 'सूर्य पाहिलेला माणूस' या नाटकांतील अवघड भूमिका त्यांनी उतारवयातही मोठ्या ताकदीने केल्या. नव्या रंगकर्मींना आधार देण्याचे, बळ देण्याचे काम ते कायम करीत. अगदी अलीकडेपर्यंत पुण्यातील नाटकाच्या कुठल्याही नव्या प्रयोगाला ते पत्नी दीपा श्रीराम यांच्यासह पहिल्या रांगेत हजर असत. मुलगा तन्वीर याच्या अपघाती निधनानंतर त्यांनी रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी 'तन्वीर सन्मान' पुरस्कार सुरू केला. अगदी एक-दोन वर्षांपूर्वीपर्यंत ते या कार्यक्रमाला पूर्ण वेळ हजर असत. नव्वदी ओलांडल्यानंतरही ते वेताळ टेकडीवर नियमित चालायला जात. कर्वेनगर परिसरातील अनेकांना आपले 'दादा' सकाळी फिरताना दिसत. डॉ. लागू यांच्या निधनाने केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर भारताचा एक प्रमुख रंगकर्मी, चित्रकर्मी हरपला आहे. त्यांच्याप्रमाणे बुद्धिप्रामाण्यवाद जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.