
मुंबई- बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. १७ डिसेंबर १९७८ मध्ये रितेशचा जन्म झाला. विलासराव देशमुख यांचा हा दुसरा मुलगा. संपूर्ण देशमुख घराणं राजकारणात सक्रिय असलं तरी रितेशला लहानपणापासून अभिनेताच व्हायचं होतं. २००३ मध्ये त्याने 'तुझे मेरी कसम'मधून सिनेकरिअरला सुरुवात केली. रितेश देशमुखने मुंबईतील रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून शिक्षण घेतलं. यानंतर त्याने परदेशातील एका कंपनीत एक वर्ष आर्किटेक्ट म्हणून कामही केलं. यादरम्यानच्या काळात त्याने अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं आणि तो मुंबईत परतला. असं म्हटलं जातं की, जेव्हा सुरुवातीला रितेशने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घरच्यांना सांगितला तेव्हा त्याला विरोध करण्यात आला. असं असलं तरी रितेश मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. कालांतराने घरच्यांनीही त्याला चंदेरी दुनियेत नशिब आजमावण्याची परवानगी दिली. सध्या सिनेमात जरी रितेशचं बस्तान बसलं असलं तरी 'इवॉल्यूशन्स' ही आर्किटेक्चरल अँड इंटीरिअर डिझायनिंग कंपनीही चालवतो. याशिवाय त्याची स्वतःची प्रोडक्शन कंपनीही आहे. 'तुझे मेरी कसम' या रितेशनच्या पहिल्याच सिनेमात त्याची ओळख जेनेलिया डिसुझाशी झाली. त्यावेळी सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं तेव्हा विलासराव देशमुखे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे भविष्यात रितेशही नेताच होईल असं जेनेलियाला सुरुवातीला वाटलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे त्यात माज असेल असा विचार करून जेनेलियाने त्याला भाव दिला नाही. कालांतराने रितेश हा फार साधा मुलगा असल्याचं जेनेलियाला जाणवलं आणि मग त्यांची मैत्री फुलत गेली. १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केलं. जेनेलिया ख्रिश्चन आणि रितेश हिंदू असल्याने दोघांच्या लग्नाची चर्चाही खूप झाली होती. याच काळात दोघांचा तेरे नाल लव हो गया सिनेमाही प्रदर्शित झाला. या फ्रेश जोडीला पाहण्यासाठी लोकांनी सिनेमागृहात गर्दी केली होती. रितेश आणि जेनेलियाला दोन मुलं आहेत. २०१४ मध्ये रितेश देशमुख पहिल्यांदा बाबा झाला. रिआन असं मोठ्या मुलाचं नाव आहे. २०१६ मध्ये पुन्हा एकदा त्यांच्या घरी नवा पाहूणा आला. रितेशने दुसऱ्या मुलाचं नाव राहिल असं ठेवलं. आतापर्यंत रितेशने अनेक मल्टिस्टारर सिनेमात काम केलं आहे. 'मस्ती', 'ग्रँड मस्ती', 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'हाउसफुल २', 'हाउलफुल्ल २', 'बैंगिस्तान', 'क्या सुपर कूल हैं हम', 'डबल धमाल', 'जाने कहां से आई है', 'अलादीन', 'अपना सपना मनी मनी', 'एक विलेन' आणि 'मरजावां' यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.