
गडहिंग्लज (कोल्हापूर): जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झालेले कोल्हापूरचे सुपुत्र जोतिबा गणपती चौगुले यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी उंबरवाडीतील महागाव येथे करण्यात आले. यावेळी 'अमर रहे, अमर रहे, जोतिबा चौगुले अमर रहे', अशा घोषणा देण्यात आल्या. अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. आपल्या वीर सुपुत्राला शेवटचा निरोप देताना सर्वांचे अंत:करण जड झाले होते. ३६ वर्षीय शहीद जोतिबा गणपती चौगुले गडहिंग्लज तालुक्यातील महागावचे रहिवासी होते. जोतिबा चौगुले यांना वीरमरण आल्याची माहिती कळताच संपूर्ण महागावमध्ये शोककळा पसरली होती. चौगुले यांचे पार्थिव महागाव येथे पोहोचताच जोतिबा अमर रहे अमर रहे अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. त्यानंतर महागाव गावात अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत महागाव पंचक्रोशीतील हजारो लोक सहभागी झाले होते. राजुरी सेक्टरमध्ये सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले यांना सोमवारी गोळी लागून वीर मरण आले. हे सन २००९ मध्ये लष्करात दाखल झाले होते. ते जम्मूमधील राजुरी येथील सीमेवर तैनात होते. सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. शहीद जोतिबा आपल्या गावात लोकप्रिय होते. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या जवानाचा सर्व गावात मोठा आदर होता.