
नवी दिल्ली : सुझुकीने भारतात प्रसिद्ध स्पोर्ट्स बाइक Hayabusa ची २०२० एडिशन लाँच केली आहे. या दुचाकीची एक्स शोरुम किंमत १३.७५ लाख रुपये आहे. २०२० Suzuki Hayabusa दोन वेगवेगळे रंग मेटॅलिक थंडर ग्रे आणि कँडी डेरिंग रेडमध्ये लाँच करण्यात आली आहे. हायाबुसाच्या नव्या एडिशनमध्ये कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही. शिवाय ही दुचाकी बीएस ६ उत्सर्जन मानक इंजिनसह नसेल. सुझुकी हायाबुसा मॉडेल मर्यादित एडिशन आहे. म्हणजे ही दुचाकी अत्यंत मर्यादित प्रमाणात विकली जाणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. या दुचाकीमध्ये नवीन ग्राफिक्स आणि नवीन फ्रंट ब्रेक कॅलिपर देण्यात आलं आहे. 'सुझुकी हायाबुसा गेल्या दोन दशकांपासून जास्त काळ जगभरातील दुचाकी प्रेमींची आवडती दुचाकी ठरली आहे. आम्ही या दिग्गज दुचाकीच्या २०२० एडिशनबाबत प्रचंड उत्सुक आहोत', अशी प्रतिक्रिया सुझुकी मोटारसायकल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कोइचिरो हिराओ यांनी दिली. क्षमता आणि वेग सुझुकी हायाबुसामध्ये १३४० सीसी लिक्विड कूल्ड, इन लाइन ४ सिलिंडर इंजिन आहे. या इंजिनद्वारे ९५०० आरपीएमवर १९७ बीएचपी पॉवर आणि ७२०० आरपीएमवर १५५ एनएम पीक टॉर्क जनरेट केला जातो. हायाबुसा केवळ २.७४ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग पकडू शकते. या दुचाकीचा मर्यादित सर्वोच्च वेग २९९ किमी प्रति तास आहे. हायाबुसाचं २०२० मॉडेल भारतातील या दुचाकीचं अखेरचं मॉडेल असणार आहे. कारण, यानंतर सुझुकी नेक्स्ट जनरेशन हायाबुसा लाँच करणार आहे. नवीन जनरेशन हायाबुसा नवीन डिझाईन आणि नवीन डिझाईनसह असेल. २०२१ पूर्वी नवीन मॉडेल लाँच केलं जाण्याची कोणतीही शक्यता नाही.