
नवी दिल्ली: वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेआधीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाल्याने तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. भुवनेश्वरच्या जागी आता एका मुंबईच्या खेळाडूला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. येत्या १५ डिसेंबर दोन्ही संघादरम्यानची वनडे मालिका सुरु होत आहे. पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ चेन्नईत दाखल झाला आहे. पण वनडे मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार () पुन्हा एकदा जखमी झाला आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)ने शनिवारी भुवनेश्वरच्या दुखापती संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत झालेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमार जखमी झाला. त्याला पुन्हा हर्नियाचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आगामी वनडे मालिकेसाठी भुवनेश्ववर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. शार्दुलने बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिका खेळली होती. त्यानंतर मुंबई संघाकडून रणजी स्पर्धेत तो बडोदाविरुद्ध खेळला होता. अर्थात भुवनेश्वरच्या दुखापती संदर्भात अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. याआधी दुखापतीमुळे भुवनेश्वर संघाबाहेर होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याचा संघात समावेश झाला होता. टी-२० मालिकेत भुवनेश्वरला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या दोन सामन्यात त्याने एक ही विकेट घेतली नव्हती. तर तिसऱ्या टी-२०मध्ये ४१ धावा देत त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. वनडेसाठी असा आहे भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकिपर), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.