
बर्लिन (जर्मनी): जगातील टॉप-३० खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या एका खेळाडूसह एकूण १३५ खेळाडू हे ३ युरोपीय देश आणि अमेरिकेत सुरू असलेल्या मॅच फिक्सिंगच्या चौकशीत संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जर्मनीमधील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या याबाबतच्या वृत्तानुसार, मॅच फिक्सिंग प्रकरणात एकण १३५ खेळाडू सहभागी आहेत असा विश्वास चौकशी समितीला आहे. टॉप-३०मधील एक पुरुष खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा दाट संशय असल्याचे 'डाय वेल्ट' दैनिक आणि झेडडीएफ यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालातही म्हटले आहे. संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या खेळाडूने तीन एटीपी टूर किताब जिंकलेले आहेत. आर्मीनियाचा संबंध आर्मीनियातील सट्टेबाजी माफिया नेटवर्कचा हात या मॅच फिक्सिंगमध्ये असल्याचा खुलासाही या अहवालात करण्यात आला आहे. तसेच, आम्ही आर्मेनियातील सट्टेबाजी माफिया नेटवर्कबाबत चर्चा करत आहोत, हे नेटवर्क युरोपमधील ७ देशांमध्ये पसरलेला आहे. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफरी माजलेली आहे, असे गंभीर वक्तव्य बेल्जियमचे सरकारी फिर्यादी एरिक बिसचोप यांनी केले आहे. फिक्स करण्यात आलेल्या सामन्यांवर शेकडो छोटे छोटे सट्टे लावण्यात आले आहेत. यातील प्रत्येक सट्ट्यातून लाखो यूरोंची कमाई करण्यात आली, अशी माहिती बिसपोच यांनी दिलीय. अर्जेन्टिनाचा माजी खेळाडू मार्को ट्रुंगेलीटी याने आपल्याशी सट्टेबाजांनी संपर्क केल्याचे सांगितले असल्याचे 'झेडडीएफ' आणि 'डाय वेल्ट'ने म्हटले आहे. पहिल्या ५० मध्ये व्यावसायिक खेळाडूंनीही सामने फिक्स केल्याची माहिती ट्रुंन्गॅलिटीने दिली आहे. हा प्रकार सर्व स्तरांवर होत असल्याचेही त्याने सांगितले आहे. तथापि, यावर्षी जानेवारीत, स्पेनच्या पोलिसांनी एका अर्मेनियाच्या टोळीने केलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान १५ लोकांना अटक केली. शिवाय अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्पॅनिश टेनिसपटू मार्क फोर्नेल मेस्ट्रेसही होता असाही दावा करण्यात आला होता.