
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी आज दिल्लीतील रामलीला मैदानात 'धन्यवाद रॅली'ला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या सभेद्वारे भारतीय जनता पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकणार आहे. दिल्लीतील १७३४ अवैध वसाहतींना नियमित केल्याबाबत पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भाषणे सुरू झाली आहेत.
केंद्र आणि राज्यात एकाचवेळी भारतीय जनता पक्षाची सरकारे असतील तर विकास जलद गतीने होतो, असे विजेंद्र यांनी या सभेला संबोधित करताना म्हटले आहे. पंतप्रधान मोदी कलम ३७० हटवले, त्यांच्या कार्यकालात राममंदिराची निर्मिती होत आहे, त्यांनी नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती केली असे सांगत जर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तर दिल्लीचे हवा-पाणी स्वच्छ होणार नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एका वर्षात हे काम आम्ही करून दाखवू शकतो, असेही ते म्हणाले. 'केजरीवाल मत समझना खुद को दिल्ली का घरजमाई, कुर्सी छोडो जनता बीजेपी को लेकर आई' असा शेर सांगत भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रवेश वर्मा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. केजरीवाल यांनी दिल्लीतील नेत्यांची फसवणूक केली आहे, असा आरोपही त्यांनी केजरीवाल यांच्यावर केला. दिल्लीतील बसमध्ये पाय ठेवायला जागा नाही. श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा नाही, असे सांगत, काय, आम्हाला अशी दिल्ली हवी आहे, असा सवाल भाजप खासदार गौतम गंभीर यांनी या वेळी विचारला. जो मुख्यमंत्री १ रुपयाचे काम करतो आणि १०० रुपयांची जाहिरात करतो,असा मुख्यमंत्री आपल्याला हवा का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. जनतेसाठी जे अतिशय प्रामाणिकपणे काम करेल, असे सरकार आम्हाला हवे आहे. तुमचा सर्वांचा आशीर्वाद भारतीय जनता पक्षाला मिळेल आणि भाजप दिल्लीत सरकार बनवेल असा विश्वासही शेवटी गौतम गंभीर यांनी व्यक्त केला. चोख पोलीस बंदोबस्त दरम्यान, दहशतवाद्यांकडून पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती आल्यानंतर या सभेसाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था राखली आहे.