चोरट्यांशी झटापट झाली; महिला ट्रेनमधून पडली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 16, 2019

चोरट्यांशी झटापट झाली; महिला ट्रेनमधून पडली

https://ift.tt/38E6NI9
नवी मुंबई: दादरजवळ दिव्यांग महिलेला एक्स्प्रेसमधून ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच, आता तुतारी एक्स्प्रेसमध्येही चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला असता महिला तोल जाऊन एक्स्प्रेसमधून पडली. रविवारी ही घटना घडली. तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुवर्णा महाडिक (वय ५३) या तुतारी एक्स्प्रेसमधून (वैभववाडी-दादर) प्रवास करत होत्या. त्या दरवाजात उभ्या होत्या. त्याचवेळी चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरट्याशी झालेल्या झटापटीत त्यांचा तोल गेला आणि त्या एक्स्प्रेसमधून खाली पडल्या. सुवर्णा महाडिक यांच्या पतीनं प्रसंगावधान राखून एक्स्प्रेसची साखळी खेचून थांबवली. तसंच पोलिसांना याबाबत माहिती दिली. महाडिक या रेल्वे रुळांवर जखमी अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना जखमा झाल्या होत्या. रेल्वे पोलिसांनी त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. ठाणे पोलिसांच्या माहितीनुसार, चोरट्यानं महाडिक यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी महाडिक यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या पतीनं साखळी खेचून एक्स्प्रेस थांबवली. तसंच पनवेल रेल्वे पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, शुक्रवारीच दादरजवळ एका दिव्यांग महिलेला चोरट्यांनी धावत्या एक्स्प्रेसमधून फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही महिला अपंगांसाठीच्या डब्यातून प्रवास करत होती. त्याचवेळी चोरट्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला फेकून दिले. यात तिला एक पाय गमवावा लागला असून, दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. नगमा अन्सारी असं या दिव्यांग महिलेचं नाव आहे. चोरट्यांनी तिच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिनं चोरट्यांचा प्रतिकार केला. चोरट्यांनी तिला धावत्या एक्स्प्रेसमधून फेकून दिलं. यात तिला एक पाय गमवावा लागला, तर एक पाय जायबंदी झाला आहे. नायर रुग्णालयात शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली.