
हैदराबाद: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात असलेल्या लोकांनी आपापल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा, असे आवाहन एमआयएमचे खासदार यांनी केले. हैदराबादमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या एका सभेत ते बोलत होते. हैदराबादमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान केलेल्या भाषणात ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली. ' हा काळा कायदा आहे. जे लोक या कायद्याविरोधात आहेत त्यांनी आपआपल्या घराबाहेर तिरंगा फडकवून त्याचा विरोध करावा. ज्यामुळे सरकार करत असलेले हे कायदे चुकीचे असल्याचा संदेश भाजपपर्यंत पोहोचेल' असं ओवेसी म्हणाले. ओवेसी यांनी यावेळी आंदोलकांना अहिसेंच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहनदेखील केलं. ' या आंदोलनांदरम्यान कोणी तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही हिंसा करू नका. आंदोलनादरम्यान हिंसा झाल्यास आपली बाजू चुकीची ठरेल. आपल्याला हा लढा पुढचे ६ महिने सुरू ठेवायचाआहे. त्यामुळे शांततेत हे सगळं पार पाडलं पाहिजे. आपल्याला या कायद्याविरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारायचा आहे.' असं ते म्हणाले. या सभेला उपस्थित नागरिकांसमोर संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करत 'संविधान बचाओ दिवस' साजरा करण्यासही सांगितले. 'ही लढाई केवळ मुस्लिमांची नाही. तर या लढ्यात दलित आणि अनुसूचित जाती-जमातींचाही समावेश आहे. मी इच्छेने आणि जन्माने भारतीय आहे त्यामुळे तुम्ही मला गद्दार कसे म्हणू शकता? असा सवालही यावेळी ओवेसींनी विचारला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा मुस्लीमविरोधी आहे. तसेच यांनी यामधून धार्मिक अल्पसंख्यांक हा शब्द हटवण्याची मागणी ओवेसींनी केली आहे. ओवेसी म्हणाले की, प्रत्येक मुस्लिम हा दहशतवादी नसतो. मुस्लिमांनी भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु हे सरकार मुस्लिमांना दुय्यम दर्जा नागरिक बनवू पाहात होतं, आता हेच सरकार या नव्या कायद्याद्वारे मुसलमानांना देशातून हद्दपार करण्याचा कट रचत आहे' असा आरोपही ओवेसींनी सरकारवर केला.