दीपिकाने माझ्यासारखा सल्लागार नेमावा: रामदेव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 14, 2020

दीपिकाने माझ्यासारखा सल्लागार नेमावा: रामदेव

https://ift.tt/2RgCnDY
इंदूर: जेएनयूतील विद्यार्थ्यांना अभिनेत्री दीपिका पदुकोणने पाठिंबा दिल्यानंतर सुरू झालेल्या वादात आता योग गुरू रामदेव बाबांनीही उडी घेतली आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचं योग्य आकलन करून घेण्यासाठी दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, असा सल्ला यांनी दीपिकाला दिला आहे. जेएनयूप्रकरणावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामदेव बाबांनी दीपिकाला हा सल्ला दिला आहे. दीपिकामध्ये अभिनय गुण असणं आणि त्यात ती निपूण असणं ही वेगळी गोष्ट आहे. पण सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक गोष्टींचं ज्ञान मिळवण्यासाठी तिला पुन्हा एकदा देश समजून घ्यावा लागेल. प्रचंड वाचनही करावं लागेल. सर्वांगाने देश समजून घेतल्यानंतरच तिने निर्णय घेतला पाहिजे, असं रामदेव बाबा म्हणाले. मला वाटत अशा प्रकारच्या वादाच्या प्रसंगी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तिने माझ्यासारख्या एखाद्या सल्लागाराची नियुक्ती करावी, असंही त्यांनी सांगितलं. सीएएला पाठिंबा दरम्यान, रामदेव बाबांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला. ज्या लोकांना सीएएचा फुलफॉर्मही माहीत नाही, ते लोक याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरून टीका करत आहेत. कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला नसून नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केलंय. तरीही काही लोक आगी लावण्याचं काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. यावेळी तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ती केवळ दहा मिनिटे उपस्थित होती. त्यावरून भाजपने दीपिकावर टीका केली होती. भाजपच्या काही नेत्यांनी तर दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहनही केलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.