दारुड्या पोलिसाने बंदुकीतल्या ३० गोळ्या हरवल्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 5, 2020

दारुड्या पोलिसाने बंदुकीतल्या ३० गोळ्या हरवल्या

https://ift.tt/2sEv5St
मुंबई: एका दारुड्या पोलिसाने नशेच्या धुंदीत बंदुकीतील ३० गोळ्या हरवल्या असून वांद्रे पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या शोधण्यासाठी पाच तास घालवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अखेर पाच तास शोधाशोध केल्यानंतर या गोळ्या सापडल्या असून कर्तव्यावर असताना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी या पोलिसावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राजन धुळे असं या पोलिसाचं नाव असून ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. काल वांद्रे पश्चिमेकडील ताज लँडस एंड येथील बसस्टॉप समोर त्यांच्याकडून बंदुकीतील ३० गोळ्या हरवल्या. बंदुकीतील गोळ्या हरवल्याचं ध्यानात आल्यानंतर त्यांनी काल रात्री ९.४५ वाजता वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राजन धुळे हे आमदार भाई जगताप यांच्या सुरक्षेसाठी जगताप यांच्या कार्टर रोड येथील निवासस्थानी तैनात असताना हा प्रकार घडला. दरम्यान, बंदुकीच्या गोळ्या ठेवलेली बॅग कशी चोरीला गेली? केव्हा गेली? आणि कशी गेली? याबाबत काहीच आठवत नसल्याचं धुळे यांनी पोलिसांना सांगितलं आहे. धुळे यांच्या तक्रारीची सहाय्यक पोलीस उपायुक्त दत्तात्रय भारगुडे यांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयलक्ष्मी हिरेमठ आणि पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनवून त्यांना सदर बॅग शोधण्यासाठी पाठवले होते. या टीमने पहाटे २ वाजेपर्यंत कार्टर रोडपासून ते वांद्रे ताज लँड परिसरातपर्यंत शोधाशोध केली. पाच तासाच्या प्रयत्नानंतर अखेर त्यांना ही बॅग ताज लँडस येथील वांद्रे बस डेपोजवळ सापडली. या बॅगेत हरवलेल्या ३० गोळ्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार धुळे हे कर्तव्यावर असताना दारू प्यायलेले होते. धुळे यांच्यावर पुढील कारवाईसाठी पोलिस आयुक्तांकडे त्यांचा अहवाल पाठवण्यात आला आहे. धुळे यांना शुक्रवारी भाई जगताप यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. मात्र जगताप आणि त्यांचे कुटुंबीय घरी नसल्याने धुळे हे तिथून निघाले आणि दारू प्यायले. त्यामुळे हा प्रकार घडला. यापूर्वीही त्यांना जगताप यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. बॅग हरवल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी कार्टर रोडवरील अभिनेता शाहरुख खानच्या बंगल्याजवळही तपासणी केली. पण त्यांना बॅग सापडली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना धुळे हे ताज लँड्सच्या दिशेने डुलत डुलत जाताना दिसले. त्यानंतर ताज लँड्स जवळच्याच बस डेपोसमोर बॅग बाजूला ठेवून धुळे बसले. निघताना बॅग घेण्याचं ते विसरल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याने पोलिसांनी बसस्टॉप जवळ जाऊन ही बॅग ताब्यात घेतली.