बेंगळुरू: विद्यार्थ्यांवर सातत्याने वाढणारा दबाब आणि त्यातून येणाऱ्या तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मागील १० वर्षात भारतात ८२ हजार विद्यार्थ्यांनी केली आहे. देशात २०१८ या वर्षात दर दिवशी २८ करत असल्याचे नॅशनल क्राइम रेकोर्ड्स ब्युरोच्या अहवालात उघड झाले आहे. एक जानेवारी २००९ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत आतापर्यंत ८१ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यामध्ये ५७ टक्के विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागील पाच वर्षात झाल्या आहेत. तर, वर्ष २०१८ मध्ये १० हजार १५९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मागील दहा वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. वर्ष २०१८ मध्ये भारतात १.३ लाख जणांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ८ टक्के विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर, बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ही १० टक्क्यांच्या घरात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक १४४८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तर, तामिळनाडूमध्ये ९५३, मध्य प्रदेशमध्ये ८६२, कर्नाटकमध्ये ७५५ आणि पश्चिम बंगालमध्ये ६०९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या राज्यांमधील विद्यार्थी आत्महत्या या एकूण आकडेवारीच्या ४५ टक्के इतकी आहे. बहुतांशी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अपयश आल्यामुळे आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय विद्यार्थी आत्महत्येसाठी इतरही कारणे आहेत. अंमली पदार्थांचे सेवन, तणाव, कौटुंबिक कारणे, नातेसंबंध आदी कारणांमुळेही आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.