मुंबई : अमेरिका आणि इराणमधील तणाव काही प्रमाणात निवळल्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा खरेदीचा सपाटा लावला. यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बाजार उघडताच ४०० अंकांनी उसळला. सध्या तो ५२७ अंकांनी वधारून ४१ हजार २०० अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीनेही १५३ अंकांची कमाई करत १२१४५ अंकांचा स्तर गाठला आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये ७८७ अंकांची घसरण झाली होती. यामुळे गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान झाले होते. गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात ५०० अंकांची वाढ नोंदवत पुन्हा ४१ हजारांचा पल्ला ओलांडला. बँक, वित्त संस्था, ऊर्जा, आयटी व वाहन उद्योगांच्या समभागांना प्रचंड मागणी आहे. कोटक बँक, हिरो मोटोकाॅर्प, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एनटीपीसी,मारुती, महिंद्रा, रिलायन्स, पॉवरग्रीड या समभागांना सर्वाधिक मागणी आहे. अमेरिका आणि इराण दोन्ही देशांमधील तणाव काही प्रमाण निवळला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत अणुकरारावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. यांनतर आज आशियातील प्रमुख शेअर बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारामंध्ये तेजी होती. जागतिक बाजारात खनिज तेलाचा भाव कमी झाला आहे.