
मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्रीपासून ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना आज सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेत या सर्वांची आझाद मैदानात पाठवणी केली. दरम्यान, काही आंदोलक अजूनही 'गेट वे' येथेच असून ही जागा रिकामी करावी, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला हे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून थांबवल्याच्या बातम्या येत होत्या मात्र नंतर पोलिसांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं. गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनामुळे परिसरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या वाढली होती. सामान्य मुंबईकर आणि देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आंदोलकांनी ही जागा रिकामी करावी, असे आवाहन आम्ही वारंवार केले. त्यानंतरही आंदोलक ठाम मांडून राहिल्याने अखेर हस्तक्षेप करत त्यांची रवानगी आझाद मैदानात करावी लागली आहे, असे उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी सांगितले.