मुंबई : गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने शुक्रवारी सकाळी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १८० अंकांनी वधारला होता. सध्या तो ७० अंकांच्या वाढीसह ४१ हजार ५३० अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३० अंकांच्या वाढीसह १२ हजार २०५ अंकावर ट्रेड करत आहे. आशियातील शेअर बाजारात आज सकाळी सकारात्मक संकेत दिसून आले. सिंगापूर एक्सचेंजमध्ये तेजी होती. तर जपान आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजारांवर दबाव दिसून आला. दरम्यान गुरुवारी अमेरिकेतील डाऊ निर्देशांकात १२८ अंकांची घसरण झाली होती. आज मुंबई शेअर बाजारात नेस्ले, एशियन पेंट्स, टायटन, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, ऍक्सिस बँक, हिरोमोटो कॉर्प, सन फार्मा, मारुती, एसबीआय, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, रिलायन्स हे शेअर तेजीत आहेत. आज ९४६ कंपन्या तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात ७१.२० ते ७१.८० च्या दरम्यान राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.