
नवी दिल्ली पुलवामा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं. भारतीय सैन्याच्या तब्बल ४० जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विदारक घटनेचे व्रण प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजे आहेत. देशातील प्रत्येक नागरिक या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आपापल्या परिने श्रद्धांजली अर्पण करत आहे. काश्मिरच्या लेथपोरा सेक्टरमधील सीआरपीएफ तळावर शहीदांसाठी श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला उपस्थित राहणाऱ्या उमेश गोपीनाथ जाधव यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण उमेश जाधव अनोख्या पद्धतीनं शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. उमेश गोपीनाथ जाधव यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मूळ गावी जाऊन तेथील माती जमा केली आहे. यासाठी त्यांना संपूर्ण देशात तब्बल ६१ हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात जाधव यांचा प्रवास संपला या प्रवासाला जाधव मोठ्या अभिमानाने 'तीर्थ यात्रा' असं संबोधतात. प्रत्येक जवानाच्या गावी जाऊन येथील माती एका कलशामध्ये जमा करुन सर्व कलश एकत्र करुन जाधव श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. हे सर्व कलश सीआरपीएफ तळावर शहीद जवानांची आठवण म्हणून ठेवण्यात येणार आहेत. प्रवासात अनेक अडचणी उमेश जाधव यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी खास असला तरी तो इतकी सोपा देखील नव्हता. त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. शहीद जवानांच्या कुटुंबियांचं राहतं घर शोधणं सोपं काम नव्हतं. काही जण अत्यंत दुर्गम भागात राहतात, असं उमेश जाधव यांनी सांगितलं. उमेश जाधव हे फार्माकॉलजिस्ट आणि उत्तम संगीतकार आहेत. उमेश जाधव यांनी हा संपूर्ण प्रवास त्यांच्या एका खासगी कारमधून केला आहे. त्यांच्या कारवरही देशभक्तीवर घोषवाक्य लिहीली आहेत. कुटुंबियांनाही गर्व उमेश जाधव यांच्या या अनोख्या कार्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनाही गर्व आहे. 'माझी पत्नी आणि मुलांना माझा अभिमान वाटतो, यातच सारं काही आलं. भविष्यात माझीही मुलं सैन्यात भरती होतील आणि इतरही मुलांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे', असं उमेश जाधव सांगतात.