
तेलंगण: देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते आणि त्यांचे वेड काय आहे हे सर्वांनी पाहिलेच आहे. मात्र, भारतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या चाहतेही काही कमी नाहीत. तेलंगणची ही व्यक्ती याचे उदाहरण आहे. बूसा कृष्णा ही व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांना आपला ईश्वर मानते. ट्रम्प भारत दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना भेटण्याची बूसा कृष्णा यांची ईच्छा आहे. तशी त्यांनी केंद्र सरकारकडे विनंतीही केली आहे. कृष्णा हे तेलंगणमधील जनगाव येथे राहतात. त्यांनी गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांचा ६ फूट उंचीचा पुतळाही बसवला आहे. तेव्हा पासून ते पुतळ्याची पूजा करत आहेत. आता ट्रम्प हे अहमदाबादच्या दौऱ्यावर येत असल्याचे कळल्यानंतर कृष्णा यांनी त्यांना भेटण्याची ईच्छा बोलून दाखवली आहे. ट्रम्प हे २ दिवसांच्या दौऱ्यावर येत्या २४ फेब्रुवारीला भारतात येत आहेत. भारत आणि अमेरिकेचे संबंध असेच चांगले आणि मजबूत राहावेत असे मला वाटते असे कृष्णा यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी दीर्घायुष्य लाभो यासाठी आपण आठवड्यातून दर शुक्रवारी उपवास ठेवतो असे ते सांगतात. त्यांचा एक फोटोही माझ्यासोबत सतत असल्याचेही ते सांगतात. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी कृष्णा ट्रम्प यांच्या फोटोचे दर्शन घेत असतात. मला ट्रम्प यांना भेटण्याची ईच्छा असून माझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारने मला मदत करावी अशी मी सरकारकडे विनंती करत आहे, असे कृष्णा यांनी सांगितले.