
नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांचे एकेकाळचे सहकारी आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आता तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याकडून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडण्यात आलंय. परंतु, उल्लेखनीय म्हणजे अद्याप या सोहळ्याचं निमंत्रण अण्णा हजारे यांना मिळालेलं नाही. त्यामुळे, या शपथविधीसाठी अण्णा हजारे यंदा तरी उपस्थित राहणार का? याची उत्सुकता कायम आहे. रविवारी, १६ डिसेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा दिल्लीच्या रामलीला मैदानात पार पडणार आहे. केजरीवाल यांनी पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांनी अण्णा हजारे यांना आमंत्रण दिलं होतं. परंतु, अण्णांनी मात्र केजरीवाल यांना शुभेच्छा देताना या कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. त्यानंतर केजरीवाल यांनी स्वत: अण्णा हजारे यांना फोनवरून सोहळ्याला येण्याची विनंती केली, परंतु अण्णांनी तेव्हाही त्यांना नकार कळवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यंदाही अण्णांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांच्याबाबत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. गेल्या २० डिसेंबरपासून अण्णा हजारे यांनी निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फासावर चढवा अशी मागणी करत मौन आंदोलन सुरू केलंय. २०११ साली लोकपाल विधेयकाच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल यांची भक्कम साथ अण्णा हजारे यांना मिळाली होती. परंतु, प्रकाशझोतात येण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल आंदोलनाचा आणि अण्णा हजारेंचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर अण्णांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे, केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं दिल्ली लोकसभा निवडणूक २०२० च्या निकालात एकूण ७० पैंकी ६२ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.