मुंबई: घाटकोपर रेल्वे स्थानकात लवकरच चेहऱ्याची ओळख पटवणारं तंत्रज्ञान बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन गर्दीत हरवलेली व्यक्ती किंवा एखादा मोस्ट वाँटेड आरोपीही पकडला जाणं शक्य होणार आहे. घाटकोपरसह नाशिक आणि मनमाड येथे प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सध्या या यंत्रणेची चाचणी घेण्यात येत असून प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा अत्यंत साधीसोपी असली तरी तिचा उपयोग प्रचंड मोठा आहे. चेहऱ्याची ओळख पटविणारी ही यंत्रणा रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म, पूल आणि रेल्वे स्थानकाच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी जोडण्यात येणार आहे. तसेच कंट्रोल रुममधून संशयित आरोपी आणि हरवलेल्या व्यक्तिंचा डेटा या यंत्रणेत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा वेळी संबंधित व्यक्ती या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या परिप्रेक्ष्यात येताच त्याचा अॅलर्ट थेट कंट्रोल रुममध्ये जाईल. त्यामुळे संबंधित व्यक्तिला ट्रेस करणं सोपं जाणार आहे. ही यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या तंत्रज्ञानाद्वारे स्टेशनवरील गर्दीचं व्यवस्थापनही केलं जाणार आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाल्यास त्याचाही अलार्म कंट्रोल रुमला येईल. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस पाठवले जाईल. हे तंत्रज्ञान या तीन स्थानकावर यशस्वी ठरल्यास इतर ठिकाणी सुद्धा ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचंही रेल्वे सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, अमेरिका, सिंगापूर, इंग्लंड आणि चीनमध्ये ही यंत्रणा कार्यरत आहे. त्याचा प्रचंड फायदा झाला असून अनेक गुन्हेगारांना आणि हरवलेल्या व्यक्तिंना या तंत्रज्ञानाद्वारे शोधण्यात यश आलं आहे.