
नवी मुंबई: शिवसेनेपाठोपाठ मनसेही हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्याचे संकेत दिल्याने भाजपनेही आता प्रखर हिंदुत्वाचा नारा दिला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक विकासाच्या मुद्द्याबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही लढण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज केली. भाजपच्या राज्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राज्यव्यापी अधिवेशन नवी मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. आगामी काळात राज्यात नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवण्यात येतील. औरंगाबाद पालिकेतही विकासाचा मुद्दा राहिल. मात्र त्याचबरोबर आम्ही औरंगाबाद पालिका निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही लढणार आहोत, असं पाटील म्हणाले. औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर झालंच पाहिजे, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. औरंगजेब आमचा पूर्वज नव्हता. संभाजी राजे आमचे पूर्वज होते. त्यामुळे औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर झालंच पाहिजे, असंही ते म्हणाले. हा पक्ष लोकल प्रश्नांसाठी जन्माला आलेला नाही. आम्ही राष्ट्रीय प्रश्नांसाठी जन्माला आलेलो आहोत. काश्मीर वाचला पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे, हे आमचे प्रश्न आहेत, असं सांगतानाच राज्यातील आघाडी सरकार हे फसवं सरकार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात आमचं सरकार असताना आम्ही काय विकास केला आणि आगामी काळात आमचं विकासाचं व्हिजन काय असेल? यावर या अधिवेशनात चर्चा होईल, असंही ते म्हणाले.
... तरच मनसेबरोबर युती मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने त्यांच्याशी भाजप युती करणार का? या प्रश्नावर त्यांनी थेट भाष्य केलं. मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण जोपर्यंत मनसे परप्रांतियांबाबतची भूमिका बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत युती होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.